मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लष्करातील अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी बिहारमध्ये तरुणांनी आंदोलन सुरु केले आहे.या आंदोलनाचा फटका मध्य रेल्वेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. आंदोलनामुळे गेल्या चार दिवसात बिहारला जाणार्या 10 ते 12 मेल-एक्सप्रेस रद्द केल्याने पाच कोटी रुपयांचे नुकसान मध्य रेल्वेला झाले आहे.
सोमवारी मध्य रेल्वेने एलटीटी-जयानगर, एलटीटी-पटना,एलटीटी- रक्सुल या गाड्या रद्द केल्या. यामुळे बिहारला जाणार्या प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने लष्करात भरती होणार्या तरुणांसाठी अग्निपथ योजना आणली आहे. अनेक राज्यात या योजनेच्या विरोधात तरुणांनी आंदोलन उभे केले आहे.बिहारमध्ये या योजनेला सर्वाधिक विरोध होत आहे.
बिहारमध्ये रेल्वेला लक्ष्य करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या गाड्यांचे डबे पेटवून देण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय
रेल्वेचे आर्थिक नुकसान होत आहे. गाड्यांची जाळपोळ होत असल्याने, त्याचा परिणाम मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.
या आंदोलनामुळे मध्य रेल्वेने मुंबईकडे येणार्या आणि जाणार्या 10 ते 12 रेल्वे रद्द केल्या आहेत. एका गाडीतून सुमारे 1500 प्रवासी प्रवास करतात. एक ट्रेन रद्द केल्याने रेल्वेला 50 लाखांचे नुकसान होते.
मध्य रेल्वेला आतापर्यत पाच कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. पश्चिम रेल्वे मार्गावरील बांद्रा टर्मिन ते बरौनी अवध एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
आंदोलनामुळे 500 रेल्वे गाड्या रद्द
अग्निपथ योजनेवरून झालेल्या आंदोलनामुळे 181 मेल एक्सप्रेस आणि 348 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने सोमवारी दिली. 4 मेल एक्सप्रेस आणि 6 पॅसेंजर गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.