मुंबई : राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणार्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट आणि गण रचनेचे प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला खर्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाने मोकळा झाला आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक वेळापत्रक तयार करण्यात आले असून, त्यानुसार 32 जिल्हा परिषदांच्या गट आणि गण यांच्या रचनेचे प्रारूप जाहीर करण्यात आले आहे.
2011 च्या लोकसंख्येनुसार गट-गण रचना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. गण रचनेची सुरुवात जिल्ह्याच्या उत्तर दिशेकडून ईशान्येकडे, नंतर पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे सरकत शेवट दक्षिणेत करायची आहे. (झिगझॅग पद्धत) यामध्ये भौगोलिक सलगता राहील याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
गट आणि गण सीमारेषा या मोठे रस्ते, गल्ली, नदी, नाली डोंगर, रस्ते, उड्डाणपूल विचारात घेऊन निश्चित करावी, असे सांगण्यात आले होते. तसेच, गट-गण रचना करताना ग्रामपंचायतीचे विभाजन करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार गट-गण रचनेचे प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. आता त्यावर हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार आहेत.
28 जुलैला प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. 11 ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्त प्राप्त हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय घेतील. 18 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्यांकडे करण्यात येईल. त्यानंतर अंतिम गट आणि गण रचना जाहीर केली जाईल. त्यानंतर आरक्षणे काढण्यात येणार आहेत.
ठाणे - 53 गट, 106 गण
पालघर - 57 गट, 114 गण
रायगड - 59 गट, 118 गण