मुंबई : राज्यात असलेल्या 277 खासगी नर्सिंग महाविद्यालयांपैकी तब्बल 47 महाविद्यालयांमध्ये शून्य ते दहा विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. शून्य प्रवेश झालेल्या महाविद्यालयांमध्ये बीड (3), यवतमाळ, नांदेड, नाशिक आणि ठाणे येथील प्रत्येकी एका महाविद्यालयाचा समावेश आहे.
राज्यात यंदा 17 सरकारी महाविद्यालये आणि 277 खासगी महाविद्यालये अशा 294 नर्सिंग महाविद्यालयांमध्ये 16 हजार 530 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध होत्या. त्यात सरकारी महाविद्यालयांमधील 1 हजार 180 जागांपैकी 1 हजार 174 जागांवर प्रवेश झाले. सरकारी महाविद्यालयांतील फक्त 6 जागा रिक्त राहिल्या आहेत. तर खासगी महाविद्यालयांमध्ये असलेल्या 15 हजार 350 पैकी फक्त 9 हजार 783 जागांवर प्रवेश झाले असून 5 हजार 567 जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे राज्यभरात मिळून 5 हजार 573 जागा रिक्त आहेत.
राज्यात 277 पैकी तब्बल 47 महाविद्यालयांमध्ये शून्य ते 10 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. त्यातही एकही जागा न भरलेल्या 7 महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच फक्त 10 प्रवेश झालेल्या महाविद्यालयांची संख्याही 7 एवढीच आहे.
शून्य ते 10 प्रवेश झालेल्या महाविद्यालयांची सर्वाधिक संख्या सांगलीमध्ये आहे. सांगलीतील तब्बल 7 महाविद्यालयांमध्ये 10 पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत. त्या खालोखाल अहिल्यानगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांचा क्रमांक आहे. पुणे, नागपूर, ठाणे, या जिल्ह्यांमधील प्रत्येकी एका महाविद्यालयात अत्यंत कमी प्रवेश झाले असून नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील दोन महाविद्यालयांचा समावेश आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात कमी प्रवेश
सर्वात कमी प्रवेश झालेल्या 47 पैकी 16 महाविद्यालये पश्चिम महाराष्ट्रात आहेत. यात सांगली 7, कोल्हापूरमधील 6, सोलापूरमधील 2, आणि पुण्यातील एका महाविद्यालयाचा समावेश आहे. त्या खालोखाल बीड 4, नांदेड 2, छत्रपती संभाजीनगर 2, आणि धाराशीव, लातूर, जालना आणि परभणी येथील प्रत्येकी एक अशा 12 महाविद्यालयांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 6 महाविद्यालयांसह नाशिकमधील 2 महाविद्यालयांचाही समावेश अत्यंत कमी प्रवेश झालेल्या महाविद्यालयांच्या यादीत आहे.