मालाड; पुढारी वार्ताहर : मालवणी गावातील रहिवासी अण्णादुरायी यांच्या मुलाला सर्दी, तापासाठी दिलेल्या इंजेक्शनमुळे पायाला मोठी जखम झाली असून त्याचा जीव थोडक्यात बचावला आहे. याबाबत मालवणी पोलिसांत व महाराष्ट्र मेडिकल काउंसिलकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
अण्णादुरायी यांचा अकरावीत शिकणारा मुलगा विनीत (वय १७) याला ९ ऑगस्ट रोजी सर्दी, तापाच्या उपचारासाठी परिसरातील डॉक्टर जसविंदर सिंग यांच्याकडे नेले. डॉ. सिंग यांनी विनीतच्या डाव्या कमरेखाली इंजेक्शन दिले. विनीतला घरी आणल्यानंतर इंजेक्शन दिलेला पाय सुजायला लागला. दुसऱ्या दिवशी पुन्हा डॉ. सिंग यांच्याकडे नेल्यावर त्यांनी विनीतला गणेशनगर येथील आरएमएस हॉस्पिटलमध्ये
घेऊन जाण्याचा सल्ला दिला. विनीतला आरएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तेथील डॉ. शुक्ला यांनी विनीतच्या पायावर शस्त्रक्रिया करून घरी सोडले. घरी आणल्यावर पायातून पू सुरु झाला. त्यानंतर येथील यशस्वी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर विनीतची परिस्थिती गंभीर असल्याचे तिथल्या डॉक्टरांनी सांगितले. त्याला आयसीयूमध्ये दाखल करून १२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत दोन शस्त्रक्रिया झाल्या, तसेच पायाची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.
माझ्या मुलाला चुकीचे इंजेक्शन दिल्याची कबुली डॉ. जसविंदर सिंग यांनी दिली. मात्र त्यांच्या चुकीमुळे माझ्या तरुण मुलाचा जीव धोक्यात आला, तसेच त्याच्या पायावर तीन शस्त्रक्रिया झाल्या. त्यामुळे मागील दीड महिन्याहून अधिक काळ तो कॉलेजलाही जाऊ शकला नाही.
तसेच मलाही साडे नऊ लाखांचे कर्ज घ्यावे लागले.
-अण्णादुरायी कावंडर, पीडित मुलाचे वडील.