पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते, लेखक,गीतकार मंगेश कुलकर्णी यांचे शनिवारी ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात दोन बहिणी आहे. दिवंगत अभिनेते दिलीप कुलकर्णी यांचे ते बंधू होते. त्यांच्या पार्थिवावर भाईंदर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंगेश कुलकर्णी हे मुळचे नाशिकचे. त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. प्रसिध्द दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. दिल्ली दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या लाईफलाईन या वैद्यकीय मालिकेचे लेखनही त्यांनी केले होते. या मालिकेत त्यांनी भूमिकाही केली होती. सह्याद्री वाहिनीवरील अनेक मालिकांचे लेखन त्यांनी केले होते. त्यांनी अनेक मालिकांचे शीर्षकगीतांचेही लेखन केले होते. त्यातील आभाळमाया, वादळवाट, आम्ही सारे खवय्ये, मनमानसी, मंथन या मालिकांची शीर्षकगीते आजही रसिकांच्या ओठावर आहेत. शाहरूख खान फेम यस बॉस, नाना पाटेकर अभिनित गुलाम - ए - मुस्तफॉ, प्रहार, आवारा, पागल, दिवान या चित्रपटांच्या कथांचे लेखन त्यांनी केले होते.
कुलकर्णी यांना गेल्या महिन्यापासून ह्दयविकाराचा त्रास होत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटत होते, त्यातच त्यांचे शनिवारी भाईंदर मधील ज्येष्ठांच्या सेटरमध्ये निधन झाले.