Worli BDD Chawl | वरळी बीडीडीवासीयांचा नव्या टॉवरमध्ये गणेशोत्सव Pudhari File Photo
मुंबई

Worli BDD Chawl | वरळी बीडीडीवासीयांचा नव्या टॉवरमध्ये गणेशोत्सव

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या हस्ते होणार चाव्यावाटप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून नव्या टॉवरचे स्वप्न बाळगून असलेल्या वरळी बीडीडी चाळीतील कुटुंबीयांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. वरळी बीडीडी चाळीतील पुनर्विकास प्रकल्पापैकी फेज 1 अंतर्गत 556 घरे बांधून पूर्ण तयार झाली असून बुधवार, 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चाव्या दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बीडीडी चाळीतील मध्यमर्गीय कुटुंबांचा गणेशोत्सव नव्या टॉवरमधील घरात साजरा होणार आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्ताकाळात 1 ऑगस्ट 2021 रोजी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. वरळी बीडीडी चाळीतील 1690, नायगाव बीडीडी चाळीतील 1400 आणि ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील 342 रहिवाशांना नव्या घराचा ताबा देण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. त्यापैकी वरळीतील पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत डी आणि ई या दोन इमारतींना ओसी मिळाली असून 556 घरे पूर्णत: सज्ज आहेत. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री वॉररूमध्ये 30 प्रकल्पांचा आढावा घेतला होता.

यामध्ये वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांना लवकरच सदनिकांचे वाटप करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली होती. तसेच नायगाव व एन.एम.जोशी मार्ग चाळीतील रहिवाशांना ठरलेल्या वेळेत सदनिका देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीडीडी चाळ पुनर्वसनातील कुटुंबीयांना वेळेत नव्या घराचा ताबा मिळावा यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, 14 ऑगस्ट रोजी सरकारने चाव्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे चाव्या वाटपाचा कार्यक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मध्य मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी सुमारे 86 एकर भूखंडांवर बीडीडी चाळी पसरलेल्या आहेत

मुंबईत 207 बीडीडी चाळी आहेत

वरळी येथे 121, डिलाईल रोडला 32, नायगावात 42 आणि शिवडी येथे 12 चाळी आहेत

या सर्व चाळींमध्ये 16 हजार 545 कुटुंबे राहतात. त्यापैकी पोलिसांची 2 हजार 916 कुटुंबे आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT