मुंबई : मुंबई शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेत मृत्यूशी तीन तास झुंजणारी महिला अखेर मृत्युमुखी पडली.
माहीमच्या राहणार्या आणि मूळ गाव सफाळे असलेल्या छाया पुरव यांचा उपचारापूर्वीच जीव गेला आणि कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा असला तरी बधीर यंत्रणांचे डोळे या घटनेने उघडतील काय हा प्रश्नच आहे. ठाणे-घोडबंदर महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार-वसई ते घोडबंदर या मार्गावर रोजची वाहतूक कोंडी आहे. याच कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने छाया कौशिक पुरव यांचा मृत्यू झाला.
छाया पुरव या मुंबईतील माहीम कोळीवाडा येथे राहत होत्या. सुट्टीच्या काळात मूळ गावी सफाळे मधुकर नगर येथे त्या गेल्या. जिल्हा परिषद शाळेजवळ आणि घराजवळ झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू असताना त्यांच्या अंगावर फांदी पडली आणि त्या गंभीर जखमी झाल्या. प्रथमिक उपचारांसाठी त्यांना आधी पालघरला नेण्यात आले. पण प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात हलवण्याचे कुटुंबीयांनी ठरवले. मात्र, वाहतूक कोंडीमुळे त्यांची रुग्णवाहिका तब्बल तीन तास अडकून पडली आणि मुंबईला पोहोचण्यास उशीर झाला. या दरम्यान छाया पुरव यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना मीरा रोड येथील ऑर्बिट रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.