Mumbai Airport Drug Seizure
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. एका भारतीय महिलेकडून ६२.६ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेटमध्ये भरून ड्रग्जची तस्करी करण्याचा अनोखा फंडा या महिलेने वापरला होता.
डीआरआय मुंबईच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ही भारतीय महिला दोहाहून मुंबईला आली होती. भारतात तिच्याकडून अंमली पदार्थांची तस्करी होणार होती. त्यानुसार, डीआरआय मुंबईच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर पोहोचताच तिला थांबवण्यात आले. तिच्या सामानाची सखोल झडती घेतली असता, त्यात ६ ओरिओ बिस्कीटचे बॉक्स आणि ३ चॉकलेटचे बॉक्स सापडले. हे बॉक्स उघडून पाहिले असता बिस्कीट आणि चॉकलेटमध्ये ३०० पांढऱ्या कॅप्सूल आढळल्या. फिल्ड टेस्ट किट वापरून सर्व कॅप्सूलची चाचणी करण्यात आली. एकूण ६२६१ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. याची बाजारमूल्य ६२.६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.