मृणालिनी नानिवडेकर
मुंबई : विधान परिषद निवडणुकीदरम्यान सुरू झालेल्या माघारीनाट्यामुळे मविआत अविश्वासाने थैमान घातले आहे. राष्ट्रवादीने पुणे येथे दिलेल्या धोक्यामुळे त्यांना आघाडीतून बाहेर काढा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे, तर दुसरीकडे अधिकृत उमेदवार रिंगणातून पळून जाणे हा पक्षावर नियंत्रण नसल्याचा प्रकार असल्याने सपकाळ यांना हटवा अशी मोहीम सुरू झाली आहे.
उमेदवारांनी माघार घेण्यामागे पक्षातील अंतर्गत बंडाचा हात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदावरून हर्षवर्धन सपकाळ यांना हटवा, अशी मागणी गेल्या तीन-चार दिवसांपासून काही गटांनी सुरू केली होती. आता रिंगणात दाखल केलेले उमेदवार माघार घेतातच कसे? पक्ष संघटनेवर श्रेष्ठींचा वचक नाही काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेसअंतर्गत हा वाद पेटायच्या आधीच शह-काटशहाचे राजकारण असावे किंवा अन्य काही वेगळे निमित्त, मात्र पुणे येथे वाद सुरू झाला आहे.
मविआ नेत्यांत बेदिली
शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेता रिंगणातून बाहेर पडलाच कसा? आता या महाविकास आघाडीला अर्थ नसल्याचेही काँग्रेसच्या गटातर्फे सांगितले जाऊ लागले आहे. हर्षवर्धन सपकाळ विरुद्ध अन्य अशा लढाइला धुमारे फुटण्याच्या आधीच काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशा पद्धतीचा एक संघर्ष सुरू करीत काँग्रेसने वेगळे राजकारण सुरू केले आहे. उमेदवार माघारीच्या नाटयावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये किती बेदिली निर्माण होणार याकडे आता संबंधितांचे लक्ष लागले आहे.
राज्यात सपकाळ हटाव मोहीम
नाशिक येथे उद्धव ठाकरे यांच्या गटाने एबी फॉर्म असतानाही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली असतानाही अर्ज मागे घेणाऱ्या दोन उमेदवारांना पक्षातून काढून टाकण्याची कारवाई सुरू झाली आहे. प्रत्यक्षात काँग्रेसमधील महाभारत हे मोठ्या स्तरावरचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकांकडे डोळे ठेवून तसेच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना तयार करण्यासाठी देशातील काही राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही सपकाळ यांच्या हातून हे पद जावे, अशी मोहीम सुरू झाली आहे.
माघारीमागे आर्थिक व्यवहार?
काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थता पसरली होती. त्यातच माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, लोकलेखा समितीचे प्रमुख विजय वडेट्टीवार अशा विदर्भातीलच नेत्यांनी सपकाळ यांच्या विरोधात काम सुरू केल्याचे बोलले जाते. पक्षात सारे काही फारसे नीट नाही. सपकाळ यांच्या नेतृत्वातील चमूने दिलेले उमेदवार माघार का घेतात? त्यामागची कारणे काय? त्यामागे काही आर्थिक व्यवहार झाले का? झाले असतील तर नेतृत्व काय करत होते, अशा पद्धतीचे नवे प्रश्न आज समोर आले आहेत.
काँग्रेस दरबारी राजकारणात
येत्या दोन ते तीन दिवसांत राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्रातील काही नेते दिल्लीला पोहोचणार असून सपकाळ यांना हटवावे अशी त्यांची मागणी असेल. सपकाळ यांनी गेले काही दिवस पक्षाला उभारी देण्याचे मोठे प्रयत्न केले आहेत; पण त्यांना यश मिळून न देणे हाच काही बड्या नेत्यांचा उद्देश असल्याची त्यांच्या गटाची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांना समवेत घेऊन खरे तर विधानसभेत सक्षम पर्याय निर्माण करायची गरज असताना काँग्रेस स्वतःच्याच दरबारी राजकारणात गुंतली असल्याची खंत एका ज्येष्ठ नेत्याने 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.