चंदन शिरवाळे
मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या (डीमिलेशन बिल) पार्श्वभूमीवर राज्यात आणखी एक मोठी राजकीय हालचाल सुरू आहे. खासदारांच्या संख्याबळासाठी शिंदे गटाने ‘उबाठा’ शिवसेनेचे ६ खासदार फोडल्यानंतर आता ९ खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाने जोर धरला आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व पार्थ पवार यांना वगळून दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करण्याचा घाट घातला जात असून राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार या गाठीभेटींच्या केंद्रस्थानी असल्याचे समजते.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पक्षातील अजित पवार गटाच्या काही नेते आणि आमदारांनी महिनाभरापूर्वी उघड विरोध केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव खा. पार्थ पवार यांच्या कार्यशैलीवर अजित पवार गटाचे नेते, मंत्री आणि आमदार यांची नाराजी वाढत चालली आहे. ही नाराजी आता इतक्या टोकाला गेली आहे की, सुनेत्रा पवार आणि पार्थ या दोघांना वगळून दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करण्यास अजित पवार यांच्याबरोबरीच्या मातब्बर नाराजांनी सहमती दर्शवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि एकमेव खासदार सुनील तटकरे यांनी यासंदर्भात आधी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ज्येष्ठ नेते आणि निवडक आमदारांसोबत सकारात्मक चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी मागील आठवड्यात पुन्हा एक बैठक झाली. या बैठकीला खासदार तटकरे व शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते, अशी माहिती सत्ताधारी राष्ट्रवादीच्या एका नेत्याने ‘पुढारी’ला दिली. या सर्व बैठकांत उपस्थित असलेल्या नेत्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण अचानक का जोर धरू लागले याची कारणेही विशद केली. त्याहीपेक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना यातून सरळ बाजूला करण्याचा विचार अजित पवार गटातच का बळावला, हेदेखील स्पष्ट केले.