Wildlife Smuggling Racket Pudhari
मुंबई

Wildlife Smuggling Racket: वन्यजीव तस्करीचे मुंबई कनेक्शन उघड; ५३ संरक्षित वन्यजीवांची सुटका

डीआरआयच्या तपासात आरोपीकडून सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सद्वारे दुर्मिळ वन्यजीवांची खरेदी-विक्री करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आला होता.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: डीआरआय (महसूल गुप्तचर संचालनालय) आणि सीबीआयने संयुक्त कारवाईत आंतरराज्य वन्यजीव तस्करी रॅकेट उघडकीस आल्यानंतर तपासाची दिशा आता 'मनी ट्रेल' आणि मुंबईतील संपर्कांवर केंद्रित केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई आणि कोलकाता येथे गेले दोन दिवस टाकलेल्या संयुक्त छाप्यांमध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी तिघे मुंबईतील आहेत. या कारवाईत ५३ संरक्षित वन्यजीवांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि देश-विदेशातील संभाव्य तस्करी नेटवर्कचा शोध सुरू आहे.

या संयुक्त कारवाईत वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या मुंबई आणि कोलकाता विभागांचीही महत्त्वाची भूमिका होती. डीआरआयच्या तपासात आरोपीकडून सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सद्वारे दुर्मिळ वन्यजीवांची खरेदी-विक्री करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आला होता.

प्राथमिक तपासात आरोपी देशातील विविध भागांतून संरक्षित वन्यजीव गोळा करून त्यांची विक्री करत होते. ग्राहकांकडून मागणी आल्यानंतर विविध राज्यांतून वन्यजीव गोळा करून त्यांची बेकायदा वाहतूक केली जात होती,असे तपासात उघड झाले.

संयुक्त कारवाईत १५ स्लो लोरिस, २ बिंटुराँग, २८ इंडियन स्टार कासवे, ६ इजिप्शियन गिधाडे आणि २ शिक्रा पक्षी अशा एकूण ५३ संरक्षित वन्यजीवांची सुटका करण्यात आली. या सर्व प्राण्यांना महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्यांच्या आरोग्याची तपासणी आणि पुनर्वसनाची प्रक्रिया केली जाणार आहे.

दरम्यान, तपास यंत्रणांनी आरोपींकडून जप्त केलेले मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहेत. बँक खात्यांमधील व्यवहार, यूपीआय पेमेंट, ई-वॉलेट आणि इतर आर्थिक देवाणघेवाणीचा मागोवा घेतला जात आहे. या रॅकेटमागे मोठे आर्थिक जाळे असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

प्राथमिक तपासानुसार, दुर्मिळ वन्यजीवांची विक्री देशांतर्गतच नव्हे, तर परदेशी ग्राहकांनाही केली जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे तपास यंत्रणा आता आंतरराष्ट्रीय संपर्क, आर्थिक व्यवहार आणि इतर राज्यांतील साथीदारांची माहिती गोळा करत आहेत.

ठळक मुद्दे

  • तपासाचा फोकस आता 'मनी ट्रेल'वर

  • आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी

  • यूपीआय, ई-वॉलेट आणि ऑनलाइन व्यवहारांची छाननी

  • सोशल मीडिया व एन्क्रिप्टेड चॅटचे फॉरेन्सिक विश्लेषण

  • मुंबईतील संपर्क आणि ग्राहकांची ओळख पटविण्याचे प्रयत्न

  • परदेशी तस्करी नेटवर्कशी संबंधांची चौकशी.

संघटित आर्थिक गुन्हा म्हणून पहा

वन्यजीव तस्करी हा आता केवळ वन विभागापुरता मर्यादित गुन्हा राहिलेला नाही. दुर्मिळ प्राण्यांच्या वाढत्या काळ्या बाजारामुळे या गुन्ह्यांमध्ये संघटित टोळ्या, ऑनलाइन व्यवहार आणि हवाला किंवा इतर आर्थिक माध्यमांचा वापर होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे डीआरआय आणि सीबीआय या प्रकरणाकडे केवळ वन्यजीव तस्करी म्हणून नव्हे, तर संघटित आर्थिक गुन्हा म्हणूनही पाहत आहेत,असे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT