नरेश कदम, मुंबई
राज्यात 2019 मध्ये सत्तेसाठी बनलेल्या महाविकास आघाडीला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयोग आघाडीला महाराष्ट्राच्या सत्तेवर घेऊन जाईल, असे चित्र लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून दिसत होते. पण फाजिल अतिआत्मविश्वासाचे वारे कानात शिरल्यामुळे आघाडी जमिनीवर आदळली.
लोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या परंपरागत मुस्लिम व दलित मतदारांनी उद्धव ठाकरे यांना जास्त पसंती दिली. तसेच जागा वाटपातही मुस्लिम व दलित मतदार निर्णायक असलेल्या जागा ठाकरे गटाने खेचून घेतल्याने काँग्रेसला फटका बसला. भविष्यात ठाकरे गटाकडे आपला मुस्लिम-दलित हा परंपरागत मतदार जाईल की काय अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. केवळ मुंबईतच नाही तर एमएमआरमधील महापालिकांमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट वेगळे लढण्याचा फटका बसेल, असे ठाकरे गटाला वाटत आहे.
मुंबईत राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मात्र, भाजपची साथ सोडल्यामुळे गुजराती, जैन, मारवाडी आणि उत्तर भारतीय समाज ठाकरे गटापासून दूर गेला आहे. त्यामुळे या व्होट बँकेची भरपाई मुस्लिम-दलित मतांमुळे झाली होती. मात्र, काँग्रेस व उद्धव सेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळे लढले तर या मतांची विभागणी होऊ शकते. हा धोका उद्धव ठाकरे यांना सतावत आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी जरी महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचे जाहीर केले असले तरी उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी बोलणे सुरू आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी अद्याप उद्धव यांना शब्द दिलेला नाही. मात्र, अखेरच्या क्षणी काँग्रेस सोबत येईल, अशी ठाकरे गटाला अपेक्षा आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. येथील सत्ता गेली तर उद्धव यांना मोठा फटका बसेल. त्यामुळे ठाकरे गट कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत. काँग्रेसला मुंबईतील मुस्लिम-दलित, तसेच उत्तर भारतीय मतदार पुन्हा कायम राखायचा आहे. त्यामुळे त्यांना या मतांमध्ये दुसरा वाटेकरी नको आहे. म्हणून उद्धव सेना आणि काँग्रेस यांच्यात ही झुंज सुरू आहे.