Thackeray Shiv Sena | ठाकरेंची शिवसेना पुन्हा पुन्हा का फुटते? 
मुंबई

Thackeray Shiv Sena | ठाकरेंची शिवसेना पुन्हा पुन्हा का फुटते?

पुढारी वृत्तसेवा

नरेश कदम

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे एक जरब. राज्याच्या राजकारणात इतकी जरब कोणत्याही पक्षात नव्हती. हा लौकीक इतिहासजमा झाला असून आजवरच्या वाटचालीत शिवसेना चारवेळा फुटली आणि अवघ्या दोन वर्षांत दोन वेळा शिवसेना फोडण्याचा विक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोंदवला.

१९६६ मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेत पक्ष स्थापनेनंतर २३ वर्षानंतर ठाण्यात पहिली गद्दारी झाली. १९८९ मध्ये ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडे बहुमत असताना सेनेची मते फुटली आणि शिवसेनेचा उमेदवार या महापौरपदाच्या निवडणुकीत पराभूत झाला. तेव्हा नगरसेवक श्रीधर खोपकर यांच्यावर’ गद्दार’ असा ठपका ठेवला आणि अवघ्या महिनाभरात खोपकर यांचा खून झाला.

२००५ मध्ये नारायण राणे यांनी पाडली फूट

शिवसेनाप्रमुखांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले. पण ते केवळ ९ महिने मुख्यमंत्री होते. त्यानंतर युतीची सत्ता गेली. पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची राणे यांची महत्वाकांक्षा होती. त्या काळात उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात शिवसेनेचे सूत्रे आली होती. उद्धव यांना त्यांच्या जवळची नेते मंडळी मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने दाखवत होती. यात उद्धव आणि राणे यांच्यातील मतभेद वाढू लागले. राणे यांना डावलले जात होते. त्यामुळे राणे यांनी ९ आमदारांसह काँग्रेसची वाट धरली.

२००६ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली

राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व जावू नये, यासाठी पक्षातील नेत्यांचा एक गट कार्यरत होता. राज यांनाही पक्षात डावलले जात होते. उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख करण्यात आले. त्यामुळे राज दुखावले. परिणामी, माझ्या विठ्ठलाला ( बाळासाहेबांना) बडव्यांनी घेरले आहे, असा आरोप करत राज यांनी शिवसेना सोडली. यावेळी राज ठाकरे यांच्या शिवसेना सोडण्यामागचे कारण उद्धव यांची कार्यपद्धती हेच होते. उद्धव यांचा पक्षावर एकछत्री अंमल असताना ठाण्यात मात्र एकनाथ शिंदे यांचे प्रस्थ वाढत होते. त्यांना वेसण घालण्यासाठी काही नेते मातोश्रीवर येत. त्‍यातून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे यांच्याकडे जबाबदारी देण्यास उद्धव तयार नव्हते. मात्र उद्धव यांच्या जवळच्या काही जणांनी शिंदे हेच कसे निवडणूक जिंकतील अशी तरफदारी केली. आणि तेथेच उद्धव यांनी, पुढच्या पक्षफुटीची वीट रचली.

२०२२ मध्ये शिंदे यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी फूट शिवसेनेत पाडली आणि राज्यात सत्तांतर झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद गमावून बसले. २०२२ मध्ये एवढी मोठी फूट पक्षात पडल्यानंतर तरी उद्धव यांनी आपली कार्यपद्धती त्यांनी बदलायला पाहिजे होती. मात्र पक्ष प्रमुख म्हणून पक्ष आणि आमदार खासदार सांभाळण्यास ते अपयशी ठरले. लोकांना भेटायचे नाही, ही ‘नवाबी ‘पध्दत लोकशाहीत चालत नाही. त्याचा फायदा शिंदे पुरेपूर उठवत आहेत. माझ्याकडे देण्यासारखे काही नाही असे बोलून चालत नाही. कार्यकर्त्यांना आर्थिक ताकद ही द्यावी लागते. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांना दिली गेली, असे होत नाही. मुंबई व ठाणे महापालिका वगळली तर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ते किंवा आदित्य ठाकरे फिरकले नाहीत..अशी असंख्य कारणे उद्धव ठाकरे गटातील आमदार आणि खासदारांच्या ताज्या उद्रेकामागे दडली आहेत.

६० वर्षांच्या कालखंडात चारवेळा शिवसेना फुटली

शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत शिवसेनेत छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे अशी तीन वेळा मोठी फूट पडली. प्रत्येकवेळी या नेत्यांच्या बंडामागची कारणे वेगवेगळी होती. १९८९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ३० पेक्षा जास्त आमदार निवडून आले होते. तेव्हा मनोहर जोशी आणि छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष हे या बंडा मागचे मूळ कारण होते. जोशी यांना झुकते माप दिल्यामुळे भुजबळ नाराज होते. आणि ते शरद पवार यांच्या गळाला लागले. पण तेव्हा त्यांच्यासोबत पाच आमदार गेले, तेव्हा शिवसेनेची दहशत इतकी होती की, भुजबळ यांना लपून बसावे लागले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT