CJP Protest Mumbai Pudhari
मुंबई

CJP Protest Mumbai: शिवाजी पार्कमध्ये CJPच्या आंदोलनाला ब्रेक; मुंबई पोलिसांनी परवानगी का नाकारली? सांगितली ४ महत्त्वाची कारणं

CJP Protest Mumbai: मुंबई पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे CJPच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.

Rahul Shelke

CJP Protest Mumbai: निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्याची घोषणा करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ला (CJP) मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशांसह विविध कारणे देत पोलिसांनी ही परवानगी नाकारली. त्यानंतर CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलनाला परवानगी न दिल्यास गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईत ‘जेल भरो आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे.

CJPच्या प्रस्तावित आंदोलनासाठी कार्यकर्ते अजिंक्य शिंदे यांनी २६ सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने ही मागणी फेटाळली. शिवाजी पार्क मैदानात सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा अधिकार मुंबई पोलिसांना नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई पोलिसांनी ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी २०१३ रोजी उच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने २० जानेवारी २०१६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार शिवाजी पार्क येथे कोणत्याही सभेला किंवा कार्यक्रमाला परवानगी देण्याचा अधिकार मुंबई पोलिसांना नाही. त्यामुळे CJPच्या आंदोलनाला परवानगी देता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

BMCची परवानगीही आवश्यक

पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारताना आणखी काही कारणे दिली आहेत. शिवाजी पार्क मैदान वापरण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) आवश्यक परवानगी अर्जासोबत जोडण्यात आलेली नव्हती. त्यामुळेही आंदोलनाला परवानगी देणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

शिवाजी पार्क परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात निवासी भाग आहे. त्यामुळे आंदोलनामुळे ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही पोलिसांनी नमूद केले.

वाहतूक कोंडीचा मुद्दाही पुढे

या आंदोलनामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवाजी पार्कच्या आसपास अनेक महत्त्वाची रुग्णालये आहेत. आंदोलनामुळे रस्त्यांवर गर्दी झाल्यास रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांच्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता पोलिसांनी व्यक्त केली.

त्यामुळे आंदोलनासाठी मुंबईतील अन्य ठिकाणाचा पर्याय शोधण्याचा सल्ला पोलिसांनी आयोजकांना दिला आहे. दुसऱ्या ठिकाणी आंदोलनासाठी नव्याने अर्ज केल्यास संबंधित प्राधिकरण नियमांनुसार त्यावर विचार करेल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

दिपकेंचा ‘जेल भरो’चा इशारा

परवानगी नाकारल्यानंतर CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी काल मुंबई पोलिसांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार नाकारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“मुंबई पोलिसांनी २ ऑक्टोबरच्या आमच्या आंदोलनालाही परवानगी नाकारली आहे. नागरिकांचा आवाज दडपण्याचे असे प्रयत्न स्वीकारले जाणार नाहीत. आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार नाकारला तर गांधी जयंतीच्या दिवशी CJP मुंबईत ‘जेल भरो आंदोलन’ करेल,” असे दिपके यांनी ‘एक्स’वर म्हटले.

निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाची घोषणा

CJPने निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील शिवाजी पार्कपासून करण्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते.

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप CJPकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आयोजित करण्यात येत आहे.

दरम्यान, ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी SIR संदर्भातील काही निर्णय आणि आदेशांबाबत अनेक वेळा आक्षेप नोंदवले होते. मात्र, निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देताना संस्थेतील चर्चेदरम्यान वेगवेगळी मते आणि निरीक्षणे व्यक्त होणे ही सामान्य प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे. आयोगाने आपल्या आदेशांना कायदेशीर आधार असून ते संबंधित कायदेशीर प्रक्रियेनुसारच घेतले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT