MLC Election 2024
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. ११ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत.  file photo
मुंबई

निवडणुकीचे गणित जमवण्यासाठी माघार कोण घेणार?

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. ११ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये कोण माघार घेणार हे ५ जुलैला निश्चित होईल.

विधानसभेत सध्या २७१ आमदार आहेत. २८८ पैकी काही आमदार लोकसभा निवडणुकीत जिंकले आहेत, तर अनिल बाबर, राजेंद्र पटणी, पी. एन. पाटील यांचे निधन झाले आहे. त्यामुळे विधानसभा आमदारांची संख्या २७१ आहे. त्यामुळे विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी २३ मतांचा कोटा आहे. भाजप १०५, शिंदे गट ३८ आणि अजित पवार गट ४० असे १८३ आमदार आहेत. महाविकास आघाडीकडे काँग्रेस ३८, शिवसेना ठाकरे गट १५ आणि शरद पवार गट १० असा ६३ आमदार आहेत. काँग्रेस प्रज्ञा सातव यांना २६ मतांचा कोटा देणार असून त्यांची १२ मते अतिरिक्त आहेत. शरद पवार गटाची १० आणि काँग्रेसची १२ अतिरिक्त मते शेकापच्या जयंत पाटील यांना मिळतील.

ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना त्यांच्या पक्षाची १५ मते मिळाली तरी त्यांना आणखी ८ मते मिळवावी लागतील. आघाडीचे मित्रपक्ष, अपक्ष आणि महायुतीतील नाराज आमदार यांची अशा प्रसंगी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपने पाच उमेदवारांपैकी एक उमेदवार मागे घ्यावा, असे प्रयत्न सुरू आहेत. तसेच महाआघाडीने एक उमेदवार मागे घ्यावा, असेही प्रयत्न सुरू आहेत.

दोन अर्ज बाद होणार

भाजपच्या पाच, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रत्येकी दोन, तर काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शेकापच्या एक उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरताना किमान १० आमदारांची प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी आवश्यक आहे. अपक्ष अरूण जगताप आणि करणी सेनेचे राज्यातील प्रमुख नेते अजय सेंगर यांच्या अर्जावर स्वाक्षरी असण्याची शक्यता कमी असल्याने त्यांचे अर्ज बाद होतील, असे सांगितले जात आहे. याचा अर्थ प्रश्न उरतो तो फक्त नार्वेकरांचा.

विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल

  • भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित

    गोरखे, सदाभाऊ खोत

  • शिवसेना शिंदे गट : भावना गवळी, कृपाल तुमाने

  • राष्ट्रवादी अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजीराव गजें

  • काँग्रेस : डॉ. प्रज्ञा सातव

  • शिवसेना ठाकरे गट : मिलिंद नार्वेकर

  • शेकाप : जयंत प्रभाकर पाटील

  • अपक्ष : अरूण जगताप, अजय सेंगर

मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण- भावना गवळी

जशी महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविली, तसेच मी म्हणेन की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण आहे', अशा शब्दांत उमेदवारी मिळाल्याबद्दल भावना गवळी यांनी आनंद व्यक्त केल्या.

उमेदवारी पाच जीवांना समर्पित-पंकजा मुंडे

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली होती. विधान परिषदेची उमेदवारी आत्महत्या करणाऱ्या कार्यकर्त्यांना समर्पित केली. 'मला जीवनात जे काही मिळणार आहे, ते मी त्या पाच जीवांच्या चरणी अर्पण करते', असे त्या म्हणाल्या.

SCROLL FOR NEXT