पुढारी ऑनलाईन डेस्क: Beed sarpanch murder case| बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक खळबळजनक दावे करत आहेत. आज रविवारी (दि.२६) त्यांनी पुन्हा एक नवीन दावा केला आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी त्यांच्या एक्स (X) अकाऊंटवरून दिली आहे.
दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "अंबेजोगाई येथील हॉटेल पियुष इन कोणाचे आहे? मला अशी माहिती मिळतेय की डॉ अशोक थोरात यांचे हे हॉटेल आहे. डॉ. थोरात हे बीड रुग्णालयात सिविल सर्जन आहेत" ह्याची चौकशी व्हायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे डॉ. थोरात यांच्याच नियंत्रणाखाली संतोष देशमुख यांचे शव विच्छेदन झाले. वाल्मीक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आले. ११ रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला ICU मधे ठेवण्यात आले. हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आत्ता मोठ्या आशिर्वादाने पुन्हा बीड मधे आगमन झाले असल्याचे खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स पोस्टमध्ये केले आहेत.