ias ashwini bhide Pudhari
मुंबई

Who is Ashwini Bhide: जयसिंगपूरच्या मराठी शाळेत शिकलेल्या अश्विनी भिडेंना 'झटपट पटापट' प्रकल्प मार्गी का लावता येतात?

Ashwini Bhide Family Background: अश्विनी भिडेंचे वडील हे स्टेट बँक ऑफ इंडियात तर आई गृहिणी

पुढारी डिजिटल टीम

who is ashwini bhide information in marathi

मुंबईच्या प्रशासकीय यंत्रणेत निर्णयक्षमता, प्रकल्प अंमलबजावणीतील काटेकोरता आणि नागरिकांशी थेट संवाद या त्रिसूत्रीमुळे ओळख निर्माण केलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अश्विनी भिडे यांच्या हाती मुंबई महानगरपालिकेची सूत्रे सोपवण्यात आली. त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. जयसिंगपूरच्या मराठी शाळेत शिकलेल्या अश्विनी भिडेंचा हा प्रवास जाणून घेऊया…

अश्विनी भिडेंची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे?

अश्विनी भिडेंचे वडील हे स्टेट बँक ऑफ इंडियात कार्यरत होते. तर आई गृहिणी. अश्विनी भिडेंना आईवडिलांकडून त्यावेळेस ज्या काही गिफ्ट मिळायच्या त्या पुस्तकाच्या स्वरूपातच असायच्या. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली.

बोर्डात नंबर तरीही कला शाखेत प्रवेश

अश्विनी भिडे यांचे शालेेय शिक्षण जयसिंगपूरच्या मराठी माध्यमात झाले. त्यावेळी दहावी- बारावीची गुणवत्तायादी जाहीर व्हायची. या यादीत अश्विनी भिडेंचे नाव होते. अभ्यासात हुशार असूनही त्यांनी कला शाखेत प्रवेश घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. याचं कारण म्हणजे साहित्याची ओढ.

एका मुलाखतीत त्या म्हणतात, कला शाखेत पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा एक पर्याय असतो. माझे एक नातेवाईक मंत्रालयात नोकरी करायचे. त्यांच्याकडून युपीएससी परीक्षेची माहिती मला मिळाली आणि मग मी देखील यूपीएससीच्या तयारीला लागले.

साहित्यात रमणाऱ्या प्रशासकीय अधिकारी

इंग्रजी साहित्य आणि नंतर मराठी साहित्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेताना त्यांनी युरोपीय, रशियन, अमेरिकन आणि भारतीय साहित्याचा व्यापक अभ्यास केला.

त्यांच्या मते, साहित्य समाजाचा आरसा असतो. समाज का बदलतो, लोक विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट पद्धतीने का वागतात — हे साहित्य शिकवते. प्रशासनात निर्णय घेताना ही संवेदनशीलता उपयुक्त ठरते.

अश्विनी भिडेंची पहिली नियुक्ती कुठे झाली?

IAS झाल्यानंतर अश्विनी भिडेंची पहिली नियुक्ती इचलकरंजी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. सहकार चळवळ, वस्त्रोद्योग, कामगार चळवळी आणि राजकीय संघर्षांनी धुमसणाऱ्या त्या भागात काम करताना अश्विनी भिडेंना खूप शिकायला मिळालं.

एक ते सव्वा वर्ष त्या तिथे होत्या. त्या काळात वेगवेगळे संप झाले, बंद झाले, बोनससाठी चार रात्र रात्र चालणाऱ्या मीटिंग झाल्या. आणि माथाडी कामगारांचा बंद झाला. अशी परिस्थिती हाताळताना वाचनाचा फायदा होतो असं अश्विनी भिडे सांगतात. साहित्याचा अभ्यास करताना अनेक कॅरेक्टरचा अभ्यास करताना ती तशी का वागतात हे बघताना त्यांच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप बदलतो आणि एक खूप वेगळ्या पद्धतीने त्याला आपल्याला अप्रोच करता येतो, असं त्या सांगतात.

अश्विनी भिडे यांनी कुठे कुठे काम केले?

कोल्हापूरनंतर पुढे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. 2004 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपसचिवपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. शालेय शिक्षण आणि क्रीडा सचिव म्हणूनही त्यांनी प्रशासकीय सुधारणा, डेटाबेस डिजिटलायझेशन आणि प्रक्रियात्मक पारदर्शकता यावर भर दिला.

अश्विनी भिडेंनी मुंबईत 18 पेक्षा जास्त वर्ष काम केले असून पायाभूत सुविधांच्या क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव आहे.

मेट्रो वुमन

अश्विनी भिडेंनी दहा वर्ष मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी काम केले. MMRDA मधील कार्यकाळात ईस्टर्न फ्रीवे, सहारा एलिव्हेटेड रोड, मिठी नदी स्वच्छता यांसारख्या प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अश्विनी भिडेंना 'झटपट पटापट' प्रकल्प मार्गी का लावता येतात?

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची स्थापना झाल्यानंतर संस्थेकडे जमीन नव्हती, परंतु प्रकल्प प्रचंड मोठा होता. हा प्रकल्प त्यांनी कसा मार्गी लावला हे समजलं तर सरकारी विभागांमध्ये समन्वय का महत्त्वाचा असतो याचा अंदाज येईल.

मुंबई मेट्रो रेल्वे भूमिगत होती. प्रकल्पासाठीची एक इंच जागाही मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे नव्हती. या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिका, म्हाडा, केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी मंत्रालये अशा विविध विभागांच्या परवानग्या लागतात. अश्विनी भिडेंनी यावर रामबाण उपाय शोधला. त्यांनी संबंधित विभागांमधील काही निवृत्त अधिकाऱ्यांची टीम तयार केली आणि या टीमला त्या त्या विभागांमध्ये संवाद वाढवायला सांगितले. पुढे याच टीममार्फत संंबंधित अधिकारी, कर्मचारी यांना प्रकल्पाबद्दलची माहिती आणि प्रेझेंटेशन दिले. यामुळे प्रकल्पाने वेग धरला आणि मुंबई मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली.

Forbes मासिकात 2024 मध्ये अश्विनी भिडेंवर लेख छापून आला होता. त्यात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक आर रामण्णा म्हणाले होते की, अश्विनी भिडे या प्रत्येक व्यक्तीशी चर्चा करतात. पुरुषांची मानसिकता कशी हाताळायची हे त्यांना उत्तम समजतं. संवाद आणि मनुष्यबळ हाताळण्याचे कौशल्य या त्यांची बलस्थानं आहेत.

समस्या सोडवणाऱ्या अधिकारी

भिडे यांचा प्रशासकीय दृष्टिकोन ‘rule-based governance’ पेक्षा ‘problem-solving governance’ असा मानला जातो. नियम हे लोकांसाठी असतात, लोक नियमांसाठी नाहीत — ही त्यांची भूमिका अनेक पुनर्वसन आणि विकास प्रकल्पांमध्ये दिसून आली.

मुंबई महानगर विकास प्राधिकारणात नियुक्ती झाल्यानंतरचा किस्सा अश्विनी भिडेंनी एका मुलाखतीत सांगितला होता. त्या MMRDA त जॉईन झाल्या तेव्हा प्रकल्प खूप होते पण प्रत्यक्षात कुठलेच सुरू झाले नव्हते. प्रत्येक प्रकल्पात अडथळ्यांचा डोंगरच होता. मूळात कोणत्याही प्रकल्पासाठीची जागा एमएमआरडीएकडे नव्हती. जागा एक तर कुठल्यातरी शासकीय संस्थेकडे आहे, कुठल्यातरी खासगी व्यक्तीकडे होती किंवा अन्य कुठल्यातरी प्रकल्पामध्ये होती. अशा वेळी लोकांमध्ये जाणं, माहिती देणं असे विविध उपक्रम सुरू करावे लागले.

मिलन सबवेसाठी अश्विनी भिडेंनी काय केले होते?

मिलन सबवे पूल हा कायम पाण्याखाली जाणारा पूल म्हणून ओळखला जायचा. तिथे रेन ओव्हर ब्रिज बांधायचा होता आणि तो प्रकल्प खूप छोटा होता. पण 400-500 लोकांचं पूनर्वसन करायचं होतं. त्यांना कुठेतरी दुसरीकडे जागा दाखवली होती पण लोक जायला तयार नव्हते आणि त्या वेळेला मग खूप त्यांच्याबरोबर सतत बैठका घेऊन त्यांना नेमकं त्यांना हे सांगितलं. तुम्हाला तिथून जावंच लागणारे, काही पर्यायी जागा असतील तर सांगा असं ठामपणे सांगितलं. हळूहळू संवाद वाढला हा प्रश्न मार्गी लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT