मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी अपघाती निधन झाल्यानंतर राज्यभरात शोककळा पसरली. गुरुवारी बारामतीत अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. धाय मोकलून रडणारे कार्यकर्ते, दादांच्या अंत्यसंस्कारस्थळी खंबीरपणे उभ्या असलेल्या सुप्रियाताई, पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकांना आधार देणारे पार्थ- जय हे अजितदादांचे पूत्र आणि शांत पण चेहऱ्यावरील दु:ख न लपवू शकणाऱ्या सुनेत्रा पवार... बारामतीतील हे दृश्य प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारे होते. अजितदादा अनंतात विलीन झाले असतानाच दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे भविष्य काय असेल?
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदी?
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यात भर पडली ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विधानाने. तरीही अजित पवारांचा वारसा चालवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अजित पवारांचे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्वप्न होतं ते आता पूर्ण करून राज्यात सुनेत्रा पवार तर केंद्रात सुप्रिया सुळे यांनी नेतृत्व करावं आणि पवार साहेबांनी ही आता एनडीए सोबत यावं अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली. सुनेत्रा पवार यांना राज्याच्या राजकारणात आणल्यास पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे जबाबदारी का?
अजित पवारांच्या अकाली एक्झिटमुळे कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत अजित पवार आणि सुनेत्रा पवारांशी असलेले भावनिक नाते पाहता त्यांच्याकडे जबाबदारी दिली जाऊ शकते. राष्ट्रवादी आणि पवार कुटुंब हे समीकरण अतूट आहे. कार्यकर्त्यांमधील सहानुभूती आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणणं या दोन्ही मुद्द्यांचा विचार केल्यास सध्या सुनेत्रा पवारच पक्ष पुढे नेऊ शकता, असे राजकीय विश्लेषक सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावे यासाठी आग्रह धरला असल्याची सूत्रांची माहिती आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात येणार असून यामध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता ठरवला जाणार आहे.
राष्ट्रवादीचं भविष्य काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्य काय, याबाबत राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यात प्रामुख्याने तीन पर्याय येतात.
1. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकारण
अजित पवार गट - शरद पवार गटाचे विलीनीकरण हा राज्याच्या राजकारणातला बहुचर्चित मुद्दा होता. अजितदादांच्या पश्चात हा पर्याय आघाडीवर आहे. अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्यांनी गुरुवारी पुढारी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेतही याबाबत भाष्य केले होते. 'अजितदादा असते तर दोन आठवड्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रचा निर्णय झाला असता', असे किरण गुजर यांनी सांगितले.
दादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, असे सुप्रिया सुळेंचे विश्वासू सहकारी विशाल तांबेंनी म्हटलंय. तर अंकुश काकडेंनी मोठं विधान केलंय. १२ डिसेंबर ला एकत्रीकरण होणार होतं, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. पुढील काळात विलीनीकरणाला दोन्ही गट प्राधान्य देतील असे तूर्तास दिसते.
2. अजित पवार गट स्वबळावर पुढे जाईल
अजित पवार गट हा आता जसा महायुतीत आहे, तसाच महायुतीत राहणार अशी देखील शक्यता आहे. शरद पवारांच्या गटाने साथ दिली नाही तरी भाजपसोबत कायम रहायचे असा एक पर्याय असू शकतो. सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे अजित पवारांचे निष्ठावंत सहकारी असले तरी त्यांचे नेतृत्व पक्षातील इतर नेते स्वीकारतील का हा प्रश्न आहेच. छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे अजित पवार गटातील लोकप्रिय नेते असले तरी त्यांची वादग्रस्त पार्श्वभूमी पाहता महायुतीत त्यांचे नेतृत्व स्वीकारले जाईल का हा प्रश्नदेखील उपस्थित होतोय..
3. नेतेच स्वबळावर
अजित पवार गटातील बरेचसे नेते यांचे एका क्षेत्रापुरते प्राबल्य आहे. अजित पवारांवरील प्रेमापोटी हे नेते त्यांच्यासोबत होते. पण अजित पवारांच्या पश्चात हे नेते स्वत: चे मार्ग निवडू शकतात, याकडेही विश्लेषकांनी लक्ष वेधले.