पालघर ( मुंबई ) : पालघर जिल्ह्यातील विविध महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांच्या भूसंपादन प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत डीएफसीसी (वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर), विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरण, मुंबई-अहमदाबाद अतिवेगवान रेल्वे (बुलेट ट्रेन), बोरीवलीविरार पाचवी व सहावी मार्गिका (MUTP-3A) तसेच रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पांशी संबंधित भूसंपादन, अनुदान वितरण व उर्वरित अडचणींवर चर्चा करण्यात आली. तसेच पालघरमधील प्रस्तावित विविध प्रकल्पांसबधित भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले.
बैठकीदरम्यान विविध प्रकल्पांशी संबंधित महत्वाच्या मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. प्रकल्पांमधील प्रशासकिय व तांत्रिक अडचणींसदर्भात आढावा घेण्यात आला. त्या सोडवून भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. "विकास प्रकल्पांमध्ये विलंब होणार नाही, यासाठी समन्वयाने काम करा," असे आवाहन केले.
या बैठकीस उपजिल्हाधिकारी, भूसंपादन समन्वय महेश सागर, उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन तेजस चव्हाण, अपर निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र राजपूत, जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख नरेंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, डीएफसीसीचे रॉय व देशपांडे, एमआरव्हीसीचे अरुण कुमार व दिक्षीत तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन.
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मोठ्या प्रमाणात अनुदानाचे वितरण.
डहाणू व वसई विभागांत संपादन पूर्ण अनुदान वितरण अंतिम टप्प्यात.
विरारडहाणू रेल्वे चौपदरीकरण.
पालघर, वसई व डहाणू विभागांत अत्यल्प क्षेत्र शिल्लक अनुदान वाटप मोठ्या प्रमाणावर पूर्ण.
बोरीवलीविरार पाचवी व सहावी मार्गिका.
वसई विभागातील भूसंपादन पूर्ण, अनुदानाचा काही भाग वाटपासाठी प्रलंबित.
रेल्वे उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभाग डहाणू व सुर्या प्रकल्प भूसंपादन पूर्ण, अनुदान वितरण प्रगतीपथावर.