मुंबई : डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईकर सुट्ट्यांचा आनंद घेण्याच्या तयारीत असतानाच पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग पॅनल कार्यान्वित करण्यासाठी 26 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजल्यापासून 27 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत एक मोठा नॉन-इंटर लॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 27 डिसेंबर रोजी तब्बल 300 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
या तांत्रिक कामामुळे केवळ 27 डिसेंबरलाच नव्हे, तर 26 डिसेंबरच्या रात्रीपासूनच रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. या कालावधीत अप आणि डाऊन दोन्ही धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार असून, प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. बोरिवली स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग पॅनल कार्यान्वित करण्यासाठी 26 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजल्यापासून 27 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत हा नॉन-इंटर लॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या कालावधीत केवळ फेऱ्या रद्द होणे इतकेच नाही, तर अनेक लोकलच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत. बोरिवली आणि अंधेरीपर्यंत धावणाऱ्या साधारण 14 लोकल फेऱ्या केवळ गोरेगाव स्टेशनपर्यंतच धावतील. तसेच कांदिवली ते दहिसर दरम्यान डाऊन जलद मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात आली असल्याने गाड्या नेहमीपेक्षा उशिराने धावतील.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, या ब्लॉक कालावधीत विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी पर्यायी वाहतूक साधनांचा अर्थात बेस्ट बस किंवा मेट्रोचा वापर करावा. रेल्वेचे हे काम प्रवाशांच्या भविष्यातील सोयीसाठी आणि गाड्यांची क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असले, तरी सध्याच्या सुट्ट्यांच्या काळात यामुळे मुंबईकरांच्या संयमाची परीक्षा पाहणारे ठरणार आहे.
दुसरीकडे, मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. रेल्वे स्थानक पुनर्विकास आणि कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी पनवेल स्थानकावर 30 डिसेंबरपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे पनवेल मार्गे कोकणात किंवा पुण्याला जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, काही गाड्या रद्द किंवा नियमित मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत.