JNPT Freight Corridor Pudhari
मुंबई

JNPT Freight Corridor: वेस्टर्न फ्रेट कॉरिडॉरमुळे JNPT होणार देशातील नंबर वन बंदर; फडणवीसांचा विश्वास

2030 पर्यंत उरणच्या जेएनपीटीची देशातील अव्वल बंदर म्हणून ओळख निर्माण होणार; जागतिक पुरवठा साखळीत भारत चीनला टक्कर देईल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला समर्पित केलेल्या ‘वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’मुळे उरण येथील जेएनपीटी हे २०३० पर्यंत देशातील पहिल्या क्रमांकाचे बंदर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच याद्वारे जागतिक पुरवठा साखळीत भारत आगामी काळात चीनला यशस्वीपणे टक्कर देऊ शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर चार मालगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, उत्तर प्रदेश ते थेट जेएनपीटी बंदरापर्यंत जाणाऱ्या या १६०० किमी लांबीच्या रेलमार्गाचे काम १ लाख ३० हजार कोटी रुपये खर्च करून पूर्ण झाले आहे. पूर्वी ट्रकमधून माल वाहतुकीसाठी तीन दिवस लागायचे, तेच काम आता या नव्या कॉरिडॉरमुळे १२ तासांत होणार आहे.

अडीचशे ट्रकची क्षमता एका ट्रेनमध्ये

देशात पहिल्यांदाच ‘डबल स्टॅक’ (कंटेनरवर कंटेनर) असणारी १ किलोमीटर लांबीची ट्रेन तयार करण्यात आली आहे. एका ट्रेनची क्षमता तब्बल २५० ट्रक एवढी असल्याने इंधनाची मोठी बचत होईल आणि प्रदूषणही घटेल.

पूर्वी भारताचा लॉजिस्टिक्स खर्च १४ टक्के होता आणि तो चीनच्या (७ टक्के) तुलनेत खूप जास्त होता. गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने तो १० टक्क्यांवर आणला. आता या कॉरिडॉरमुळे तो ७ टक्क्यांपर्यंत खाली येईल व भारत जागतिक पुरवठा साखळीत चीनशी थेट स्पर्धा करू शकेल.

राज्यात मोठी रोजगारनिर्मिती होणार

या कॉरिडॉरमुळे जेएनपीटी बंदर आगामी दोन वर्षांत १० लाख कंटेनरची हाताळणी करणारे देशातील पहिले बंदर ठरणार आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. या भव्य प्रकल्पासाठी फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व जपान सरकारच्या ‘जायका’ कंपनीचे विशेष आभार मानले.

वाढवण बंदर ठरणार गेम चेंजर : मुख्यमंत्री

आजघडीला देशातील ५५ टक्के कंटेनर्सची हाताळणी जेएनपीटीच्या माध्यमातून होते. सोबतच नव्याने बांधण्यात येत असलेले वाढवण बंदर हे जेएनपीटीपेक्षा तीनपट मोठे आहे. यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणाला मोठी गती मिळणार असून राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी ते गेम चेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT