प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhari
मुंबई

Watermelon Death Mumbai | रात्री कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होतो? सोशल मीडियावरील 'त्या' दाव्यावर तज्ज्ञ काय म्‍हणतात?

मुंबईच्या पायधोनी परिसरातील घडलेल्या घटनेवर कोणताही निष्कर्ष घाईघाईने काढू नये

पुढारी वृत्तसेवा

Watermelon Death Mumbai

मुंबई : मुंबईच्या पायधूनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाने रात्री जेवणानंतर कलिंगड खाल्ले. काही तासांतच त्या कुटुंबातील चार जणांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर रात्री कलिंगड खाणे किंवा बिर्याणीसोबत कलिंगड खाणे घातक असल्याचे दावे आणि अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या आहेत. मात्र, डॉक्टर, तज्ज्ञांचं याबाबतचं मत काय हे जाणून घेऊया पुढारी विश्लेषणातून...

कलिंगडमध्ये भेसळीचे तीन प्रकार कोणते?

कलिंगडामध्ये तीन प्रकारे भेसळ होते. त्याचा लाल रंग वाढण्यासाठी एरिथ्रोसिन नावाचे इंजेक्शन फळाला दिले जाते. दुसरे, त्याचा गोडवा वाढण्यासाठी स्वीटनरचे इंजेक्शन, तिसरे म्हणजे लवकर पिकावे म्हणून कार्बाईडचे इंजेक्शन दिले जाते. कलिंगड चांगले दिसावे म्हणून त्यावर रासायनिक मारा केला जातो. मात्र या घटकांचा मानवी शरीरावर तत्काळ परिणाम होत नाही. सतत अशा प्रकारे पिकवलेल्या कलिंगडाचे दीर्घकाळ सेवन केले तर कॅन्सरचा धोका असतो. कलिंगड खाल्ल्याने तत्काळ दुष्परिणाम होतात, असे काहीच नाही. त्यामुळे लोकांनी कलिंगडाविषयी असणारी मनातील भीती काढून टाकली पाहिजे. मुंबईच्या पायधोनी परिसरातील घडलेल्या दुर्दैवी प्रकाराचे अंतिम निष्कर्ष आलेले नाहीत. त्यामुळे एका घटनेमुळे नागरिकांनी कोणताही निष्कर्ष घाईघाईने काढू नये.

रात्री कलिंगड खावं का?

डॉ. मिलिंद कुलकर्णी सांगतात की, आयुर्वेदानुसार, कोणतेही फळ शक्यतो दूधाबरोबर घेऊ नये. तसेच रात्री कलिंगड खाऊ नये. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगडासारखे फळ जपून खाल्ले पाहिजे. कलिंगड हे बहुगुणी फळ आहे. ते शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते, श्रम परिहाराबरोबरच ऊर्जा पुरवते.

मुंबईतील घटनेनंतर कलिंगड खाणं बंद करावं का?

नाही. डॉक्टरांनी याबाबत सविस्तर भाष्य केले. कोल्हापूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. अजय शिंदे यांनी स्पष्ट केले की, बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो, असा कोणताही वैद्यकीय पुरावा उपलब्ध नाही. अशा घटनांमध्ये विषारी पदार्थांशी झालेला संपर्क लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच याबाबतचा अधिकृत अहवाल येईपर्यंत ठोस निष्कर्ष काढणे अत्यंत चुकीचे आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी फळे ताजी आहेत याची खात्री करावी. फळे नीट धुवून, स्वच्छ करून कापून फ्रिजमध्ये साठवावीत.

मर्यादित कीटकनाशकांचा वापर

उन्हाळ्याची दाहकता सुसह्य करण्यासाठी खरबूज, कलिंगड, काकडी इत्यादी रसाळ फळांचे या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन व सेवन केले जाते. या पिकावर तसे मर्यादित कीड-रोगांचा प्रादुर्भाव असल्याने तसेच उत्पादक शेतकरी सध्या प्लास्टिक आच्छादन व एकात्मिक कीड-रोग पद्धतीने नियंत्रणाचे उपाय करत असल्याने मर्यादित कीडनाशकांचा वापर करतात. त्‍यामुळे जीवितहानी होईल होण्याची शक्यता कमी असते, असे कोल्‍हापूरमधील कृषि उपसंचालक नामदेव परीट यांनी स्‍पष्‍ट केले.

कलिंगड नैसर्गिक आहे की रासायनिक? घरच्या घरी अशी करा तपासणी

आजकाल कलिंगड लवकर पिकवण्यासाठी कार्बाईड, एरिथ्रोसिन (लाल रंग) आणि स्वीटनरचा वापर केला जातो. तुमचे कलिंगड सुरक्षित आहे की नाही, हे तुम्ही खालील सोप्या पद्धतींनी ओळखू शकता...

१. पाण्याची चाचणी कलिंगडाचा एक छोटा तुकडा कापून पाण्यात टाका. जर पाणी लगेच लाल झाले, तर समजावे की कलिंगड कृत्रिमरित्‍या पिकवले आहे.

२. टिश्यू पेपरची चाचणी कलिंगडाचा कापलेला भाग टिश्यू पेपरने पुसून पाहा. जर टिश्यू पेपरने लाल रंग लगेच शोषून घेतला, तर ते कलिंगड रासायनिक रंगाचे असू शकते.

३. पिवळा डाग (Natural Spot) नैसर्गिकरीत्या वेलवर पिकलेल्या कलिंगडाचा जो भाग जमिनीला टेकलेला असतो, तिथे पिवळट रंगाचा चट्टा असतो. हा पिवळा डाग कलिंगड नैसर्गिकरीत्या पिकल्याची सर्वात मोठी ओळख आहे.

४. बियांचे निरीक्षण नैसर्गिक: कलिंगडाच्या बिया गडद काळ्या किंवा तपकिरी असतील, तर ते नैसर्गिकरीत्या पिकलेले असते. कृत्रिम: जर कलिंगड आतून लाल दिसत असूनही त्याच्या बिया पांढरट असतील, तर ते इंजेक्शन देऊन किंवा कृत्रिमरीत्या पिकवलेले असू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT