मुंबई : पाणी कपातीमुळे मुंबईत गुरुवारी अनेक भागांत पाणी आले नाही. त्‍यामुळे नागरिकांची पाण्‍यासाठी मोठी गैरसोय झाली. टँकरने पाणीपुरवठा करण्‍यात आला. मात्र तोही अपुरा पडला.  (छाया : दिपक साळवी)
मुंबई

Mumbai Water Crisis : मुंबईत सर्वत्र पाणीबाणी!

पाणीपुरवठ्यात १,२०० दशलक्ष लिटरची घट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहराला दररोज पुरवठा होणाऱ्या पाण्यामध्ये तब्बल १ हजार २०० दशलक्ष लिटर्स इतकी घट झाली. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरांत पाणीबाणी निर्माण झाली आहे. गुरुवारी अनेक भागांत पाणीच न आल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर टँकरद्वारे या भागाला पाणीपुरवठा करण्यात आला. तरीही अनेकांना पाण्याविनाच राहावे लागले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे महापालिकेने अगोदर १० टक्के (४०० दशलक्ष लिटर) पाणीकपात लागू केली होती. आता व्यावसायिक व औद्योगिक वापराच्या पाण्यात अजून २० टक्के कपात (८०० दशलक्ष लिटर) करण्यात आली आहे. परंतु अशाप्रकारे स्वतंत्रपणे औद्योगिक आणि व्यावसायिक वापराच्या पाण्यात कपात करण्याची यंत्रणा नसल्यामुळे मुंबईत सरसकट ३० टक्के पाणीकपात लागू झाली आहे. त्यामुळे रोजच्या पाणीपुरवठ्यामध्ये १,२०० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त घट झाली आहे. याचा परिणाम मुंबई शहर व उपनगरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे.

संपूर्ण शहरात असलेली ३० टक्के पाणीकपात व चोरी व गळतीच्या माध्यमातून वाया जाणारे सुमारे १५ ते २० टक्के पाणी लक्षात घेता मुंबईकरांना प्रत्यक्षात एकूण दैनंदिन पुरवठ्याच्या ५० टक्के पाणी मिळत आहे. म्हणजेच सध्या दीड कोटी जनतेसाठी दररोज २ हजार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात पाणीबाणी उद्‌भवली आहे.

बुधवारपासून ही कपात लागू झाली असली तरी जलाशयातील पाणी संपल्यामुळे याचा परिणाम गुरुवारपासून मुंबई शहरात दिसू लागला आहे. अनेक भागांत कमी दाबाने तर काही भागात पाणीच न मिळाल्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. हा त्रास आता मुंबईकरांना तलाव क्षेत्रात दमदार पाऊस दाखल होईपर्यंत सहन करावा लागणार आहे.

पाण्याच्या कमतरतेमुळे विविध भागांतून महापालिकेच्या सर्वच विभाग कार्यालयामध्ये सकाळपासूनच फोन खणखणत होते. पाण्याची कमतरता व टंचाई लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने टँकरने पाणीपुरवठा केला. परंतु नेहमी येणाऱ्या पाण्यापेक्षा टॅंकरने पुरवठा करणाऱ्या पाण्याची टक्केवारी १० ते १५ टक्के इतकीच होती. त्यामुळे अनेकांना हंडाभर पाण्यावरच समाधान मानावे लागले. खासगी टँकरद्वारेही काही भागांत नागरिकांच्या स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्यात आला.

अशी झाली पाणीपुरवठ्यात घट

  • मुंबईला होणारा पाणीपुरवठा ४,१०० दशलक्ष लिटर

  • १० टक्के कपातीमुळे ४०० दशलक्ष लिटर पाण्यामध्ये कपात

  • २० टक्के पाणी कपातीमुळे ८०० दशलक्ष लिटर कपात

  • एकूण पाणी कपात १,२०० दशलक्ष लिटर

  • गळती व चोरी ६०० ते ८०० दशलक्ष लिटर्सची कपात

  • सध्याचा पाणीपुरवठा सरासरी २ हजार दशलक्ष लिटर

या भागांत पाणीटंचाईचे चटके

कुलाबा, गिरगाव, चंदनवाडी, काळबादेवी, डोंगरी, परळ शिवडी, वरळी, धारावी, सायन, अँटॉप हिल, कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, घाटकोपर पश्चिम, भांडुप, खार , सांताक्रुझ, अंधेरी, जोगेश्वरी, मालवणी, वर्सोवा, मालाड, कांदिवली, चारकोप, दहिसर.

खासगी टँकर खर्चिक

महापालिकेकडे अपुरे टँकर असल्यामुळे अनेक झोपडपट्टीमध्ये खासगी टँकर मागवण्यात आले. मात्र या टँकरची किंमत सुमारे १२०० ते १५०० पर्यंत आकारण्यात येत असल्यामुळे हे टँकर झोपडपट्टीतील सर्वसामान्य नागरिकांसाठी खर्चिक ठरत आहेत. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

झोपडपट्टीमध्ये अधिक परिणाम

मुंबईतील इमारतींपेक्षा झोपडपट्टीमध्ये पाणीकपातीचा अधिक परिणाम जाणवला. इमारतीमध्ये पाणी साठवण्यासाठी पुरेच्या भूमिगत व इमारतीवरील टाकी असल्यामुळे इमारतीमध्ये पाण्याची फारशी टंचाई भासली नाही. मात्र झोपडपट्टीमध्ये पाणी साठवण्यासाठी स्वतंत्र टाकी नसल्यामुळे सर्वच झोपडपट्टीमध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासली. त्यामुळे पाणीटंचाईचे फोन झोपडपट्टीमधूनच सर्वाधिक आल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT