कचरा वर्गीकरण केंद्राचा स्थानिकांच्या आरोग्यावर परिणाम pudhari photo
मुंबई

Garbage sorting center health issues : कचरा वर्गीकरण केंद्राचा स्थानिकांच्या आरोग्यावर परिणाम

कांदिवलीत कचर्‍याच्या दुर्गंधीने नागरिक होताहेत हैराण

पुढारी वृत्तसेवा

कांदिवली : कांदिवली पश्चिमेला इस्लाम कंपाउंड, के डी, कंपाउंड आणि गांधी नगर विभागात सुरू केलेल्या कचरा वर्गीकरण केंद्राची दयनीय अवस्था झाली आहे.बाजूलाच आरोग्य केंद्र आहे. पसरलेले घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रुग्णांना आरोग्य केंद्रात जाण्यासाठीही कचर्‍याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याकडे महापालिकेने तातडीने लक्ष द्यावे यासाठी शाखाप्रमुख विजय मालुसरे यांनी विभाग प्रमुख संतोष राणे, विधानसभा प्रमुख राजू खान उपविभाग प्रमुख अनंत नागम यांच्यासह पहाणी केली.

केडी कंपाउंड येथे महापालिकेच्या आर दक्षिण विभागाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओला आणि सुका कचरा वर्गीकरण केंद्र सुरू केले आहे. असा मोठा फलक महापालिकेने लावला आहे. परंतू त्या ठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. केंद्राची दुरावस्था झाली आहे. दुर्गंधी पसरली आहे.इस्लाम कंपाउंड, के डी, कंपाउंड आणि गांधी नगर परिसरातील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी येथूनच मार्ग आहे.

मार्गाच्या बाजूलाच असलेला कचरा व पसरलेल्या दुर्गंधीचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.विशेष म्हणजे बाजूलाच बृहन्मुंबई महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग चारकोप 1 अ आरोग्य केंद्र आहे. एवढी दुर्गंधी पसरली आहे की त्या आरोग्य केंद्रात कोणी रुग्ण जावूही शकत नाही. त्याच्याच बाजूला कनिष्ठ अधिकारी ( junior officer ) साठी एक पोर्टा कॅबिन (porta cabin )लाखो रुपये खर्च करून बनवली आहे. त्याचीही तीच परिस्थिती आहे.अधिकारी घाण आणि दुर्गंधीत बसू शकत नाही. हा महापालिकेच्या संबंधित कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा असून ते नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत, अशी री स्थानिकांकडून ओढली जात आहे.

शाखा प्रमुख विजय मालुसरे यांनी घनकचरा विभागाच्या अधिकार्‍यांना तसेच दत्तक वस्ती योजनेच्या ठेकेदाराला परिस्थिती निदर्शनास आणून दिली.लवकरच सहायक आयुक्तांशी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT