मुंबई : पश्चिम आशियातील युद्धाची तीव्रता वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत गत 15 महिन्यांतील सर्वात मोठी साप्ताहिक पडझड झाली. शुक्रवारी सलग तिसर्या सत्रात निर्देशांकांत घसरण झाली. सेन्सेक्स 1,470 आणि निफ्टी 488 अंकांनी कोसळला.
सेन्सेक्स 1.93 टक्क्याने घटून 74,563 अंकांवर आला. तसेच, निफ्टी निर्देशांक 2.06 टक्क्याने कोसळून 23,151 अंकांवर आला. गत सप्ताहातील पाचपैकी चार सत्रांत मिळून सेन्सेक्स 4,355 आणि निफ्टी निर्देशांकात 1,300 अंकांनी घसरण झाली. गुंतवणूकदारांचे गेल्या सप्ताहात 20 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले.
रुपयात नीचांकी घसरण
युद्धामुळे 100.7 डॉलर्स प्रतिबॅरलवर गेलेले कच्च्या तेलाचे दर, जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे विदेशी गुंतवणूक संस्थांनी शेअर बाजारातून काढून घेतलेली गुंतवणूक, यामुळे रुपयाने शुक्रवारी नीचांकी पातळी गाठली. एका डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 20 पैशांनी घसरून 92.45 वर आला आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांवर हल्ले करण्याचा इशारा दिला असून, अमेरिका-इस्रायलनेदेखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. परिणामी, जागतिक व्यापाराबाबतची अनिश्चितता वाढली आहे. त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय तेल बाजारात उमटले.