Wankhede Stadium AI Photo
मुंबई

Wankhede Stadium : IPL जर्सी चोर, ऑनलाइन गेमिंग पायी तुरुंगात गेला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) स्टोअरमधून तब्बल ६.५२ लाख रुपयांच्या IPL जर्सी चोरीला गेल्या आहेत.

मोहन कारंडे

Wankhede Stadium

मुंबई : वानखेडे स्टेडियमच्या कॅम्पसमध्ये असलेल्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड, म्हणजेच बीसीसीआयच्या कार्यालयातील गोदामातून तब्बल ६.५२ लाख रुपये किमतीच्या २६१ आयपीएल जर्सी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. बीसीसीआयला ही चोरी अंतर्गत ऑडिटदरम्यान लक्षात आली.

असा उघडकीस आला प्रकार

वानखेडे स्टेडियममधील सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. फारूक असलम खान (वय ४३, राहणार मीरा रोड) असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्याने १३ जून रोजी बीसीसीआयच्या स्टोअरमधून आयपीएल २०२५ च्या २६१ जर्सी एका मोठ्या कार्टनमध्ये भरून चोरल्या. प्रत्येक जर्सीची किंमत सुमारे २,५०० रुपये असून, एकूण चोरीची रक्कम ६.५२ लाख रुपये इतकी आहे. ही चोरी लगेच उघडकीस आली नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी जुलै महिन्यात केलेल्या आंतरिक स्टॉक ऑडिटमध्ये जर्सींची कमतरता लक्षात आली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, खान हा मोठा बॉक्स घेऊन जाताना दिसला. यावरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात १७ जुलै रोजी तक्रार दाखल करण्यात आली.

ऑनलाइन जुगाराच्या व्यसनापायी चोरी

फारूक खानने चोरी केलेल्या जर्सी हरियाणातील एका ऑनलाइन डीलरला विकल्या होत्या. त्या विक्रेत्याशी त्याने सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला होता. खानने त्याला सांगितले होते की, ऑफिसमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने 'स्टॉक क्लीयरन्स सेल'अंतर्गत जर्सी विकल्या जात आहेत. डीलरला या जर्सी चोरीच्या आहेत याची कल्पना नव्हती, असे त्याचे म्हणणे आहे. आतापर्यंत २६१ पैकी फक्त ५० जर्सीच परत मिळवता आल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

चोरी केलेल्या जर्सी काय केल्या? 

पोलिसांनी सांगितले की, खान याने या व्यवहारातून मिळालेली रक्कम थेट आपल्या बँक खात्यात घेतली आणि ती सर्व रक्कम ऑनलाइन जुगारात गमावली असल्याचा दावा केला आहे. पोलिस त्याच्या बँक खात्याची चौकशी करत आहेत. दरम्यान, चोरी झालेल्या जर्सी आयपीएलच्या खेळाडूंसाठी अधिकृत वापरासाठी होत्या की पब्लिक मर्चंडाइजसाठी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी हरियाणातील डीलरला पुढील चौकशीसाठी बोलावले आहे आणि तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT