पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम रेल्वेने वानखेडे नॉर्थ फूट ओव्हर ब्रिजची यशस्वीरित्या पुनर्बांधणी केली असून तो सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे वानखेडे स्टेडियमवर खेळवल्या जाणा-या आयपीएल सामन्यांपूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी चांगली कनेक्टिव्हिटी आणि सुविधा सुनिश्चित झाली आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.
पत्रकात म्हटले आहे की, मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)कडून आवश्यक निधी मिळाल्यानंतर हा पादचारी पूल अवघ्या आठ महिन्यांत पूर्ण झाला आहे. नव्याने बांधलेल्या या पादचारी पूलाला दोन जिने आहेत. यातील एक जिना पूर्वेकडे (उत्तरमुखी) तर दुसरा जिना पश्चिमेकडे (उत्तरमुखी) आहे. यामुळे पादचाऱ्यांना सुरळीत ये-जा करता येणार आहे. विशेषतः आगामी आयपीएल सामन्यांदरम्यान याचा फायदा होईल.
वानखेडे नॉर्थ फूट ओव्हर ब्रिजच्या पुनर्बांधणीसाठी 6.50 कोटी रुपये खर्च आला आहे. या पूलाची रुंदी 6.30 मीटर तर लांबी 48 मीटर आहे. याव्यतिरिक्त, पूर्व आणि पश्चिम दिशेकडील दोन जिने 7 एप्रिल 2025 पर्यंत MCA कडे सुपूर्द केले जातील. सुरक्षा आणि दृश्यमानता वाढवण्यासाठी MCA ने प्रकाशयोजना आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
विनीत यांनी पुढे माहिती दिली की, भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबईने केलेल्या सुरक्षा ऑडिटनंतर जून 2020 मध्ये मूळ पादचारी पूल (FOB) बंद करण्यात आला होता. या महत्त्वाच्या पादचारी मार्गाची आवश्यकता ओळखून, पश्चिम रेल्वेने त्याच्या पुनर्बांधणीसाठी विशेष प्रयत्न केले आणि वेळेत काम पूर्ण केले. पश्चिम रेल्वे पायाभूत सुविधा सुधारून प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयीला प्राधान्य देण्यास वचनबद्ध आहे. या पूलाच्या पुनर्बांधणीमुळे क्रिकेट प्रेमी आणि प्रवासी दोघांनाही मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.