Voter List Schedule | जि.प., पं.स. निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर Pudhari File Photo
मुंबई

Voter List Schedule | जि.प., पं.स. निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर

8 ऑक्टोबरला प्रसिद्धी, 14 पर्यंत हरकतींसाठी मुदत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला. त्यानुसार प्रारूप मतदारयादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, निवडणूक विभागाने त्यासाठी तयारीला गती दिली.

राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदारयादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदारयादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदारयादी व मतदान केंद्रनिहाय मतदारयादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल.

मतदारयाद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदारयाद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणार्‍या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील बदल करण्यात येतात.

31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे निर्देश दिले. प्रभागांचे सीमांकन 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे. निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असलेल्या मशिन्स आणि कर्मचार्‍यांची संख्या राज्याच्या मुख्य सचिवांना तत्काळ कळवावी, असेही न्यायालयाने म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT