crime news File Photo
मुंबई

Crime news: विरारमध्ये धक्कादायक घटना! बंद फ्लॅटमध्ये आढळले तीन बहीण-भावांचे मृतदेह; पोलिसांना सापडला मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ

विरार (पश्चिम) येथील 'ग्लोबल सिटी' परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये तीन अविवाहित बहीण-भावांचे मृतदेह आढळले आहेत.

मोहन कारंडे

Virar crime news

मुंबई: विरार (पश्चिम) येथील 'ग्लोबल सिटी' परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये तीन अविवाहित बहीण-भावांचे मृतदेह आढळले आहेत. त्यांनी विष प्राशन करून जीवन संपवले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तत्पूर्वी त्यांनी गुजराती भाषेत एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, त्यात आपल्या आजारपणाची व हलाखीच्या परिस्थितीची व्यथा मांडल्याचे तपासात समोर आले आहे.

कुमार मेहता (५०), दिपेश मेहता (५२) आणि खेवना मेहता (४८) अशी मृत बहीण-भावांची नावे आहेत. हे तिघेही विरार (पश्चिम) येथील ग्लोबल सिटी परिसरातील ‘गार्डन एव्हेन्यू’ इमारतीच्या 'डी' विंगमधील फ्लॅट क्रमांक १२०३ मध्ये राहत होते. गुरुवारी या बंद फ्लॅटमधून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच बोळिंज पोलिसांनी गुरुवारी पहाटे २.३० च्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. बोळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांचा मृत्यू साधारण ३ ते ४ दिवसांपूर्वी झाला असावा. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

आजारपण आणि आर्थिक अडचणींचे दुष्टचक्र

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब २०२५ पासून या घरात भाड्याने राहत होते. तीन भावंडांपैकी एकजण अर्धांगवायूने ग्रस्त होता, तर दुसरा भाऊ कर्करोगावर उपचार घेत होता. आजारपणाच्या वाढत्या खर्चामुळे आणि उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट कोसळले होते.

आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या आजारपणाचा आणि आर्थिक विवंचनेचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी मृत भावंडांच्या दुसऱ्या बहिणीशी संपर्क साधला असता, तिघांनाही पैशांची प्रचंड चणचण भासत होती आणि त्यांनी तिच्याकडेही आर्थिक मदतीची मागणी केली होती, असे तिने सांगितले. याप्रकरणी बोळिंज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT