मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याची उभारणी ’बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनासाठी 22 हजार 250 कोटी रुपये आणि त्यावरील व्याजापोटी 14 हजार 763 कोटी अशा एकूण 37 हजार 13 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
विरार ते अलिबाग दरम्यान 126.06 किलोमीटर लांबीची बहुद्देशिय मार्गिका उभारली जाणार आहे. या प्रकल्पात पालघर जिल्ह्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बलावली दरम्यानच्या 96.410 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधा वापरा आणि हस्तांतरित करा तत्त्वावर हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही मार्गिका जेएनपीटी ते प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला जोडणारा आहे.
हा मार्ग मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848, कल्याण-मुरबाड-निर्मळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61, तळोजा बायपास मुंबई वडोदरा एक्स्प्रेस वे, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्ग, पनवेल उरण राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.
ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातून प्रस्तावित आहे. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामास बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर सुरुवात करण्यास मान्यता देण्यात आली.