मुंबई : वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमधील अतिक्रमणांवर बुधवारी दुसऱ्या दिवशीय कारवाई करण्यात आली. मात्र संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करीत आठ जणांना ताब्यात घेतले.  (छाया : मृृगेश बांदिवडेकर)
मुंबई

Mumbai Slum Demolition : गरीबनगरात दगडफेक; लाठीचार्ज!

वांद्रे पूर्वेतील ‌‘झोपड्या हटाव‌’ला गालबोट; 23 मे पर्यंत चालणार अतिक्रमण मोहीम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील गरीब नगरमधील अनधिकृत झोपडपट्टीवरील कारवाईला बुधवारी दुसऱ्या दिवशी गालबोट लागले. संतप्त जमावाने कारवाईला विरोध करीत पोलिसांवरच भांडी, बाटल्या व दगडफेक केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे काही काळासाठी वांद्रे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या दिवशीही कारवाई यशस्वी झाली असून दोन दिवसांत 60 टक्के बांधकामे निष्कासित केल्याचे सांगितले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे प्रशासनाने बंदोबस्तात ‌‘गरीब नगर‌’ झोपडपट्टीमधील अतिक्रमणांवर कारवाई हाती घेतली आहे.

मंगळवारी बंदोबस्तात पथक कारवाईसाठी दाखल झाले. यावेळीही नागरिकांनी विरोध केला. मात्र पोलीस बळावर दिवसभर कारवाई करीत शंभरच्यावर अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली होती. ही कारवाई 23 मेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगत बुधवारीही पथक दाखल झाले. मात्र झोपडपट्टीधारकांनी आक्रमक पवित्रा घेत कारवाईला विरोध केला.

कारवाई सुरू होताच स्थानिकांनी घोषणाबाजी केली. काही तरुणांनी पोलिसांवर भांडी, बाटल्या, दगड भिरकावले. यात काही पोलीस जखमी झाले. जमाव आणखी आक्रमक होत असल्याने पोलिसांनी लोठीचार्ज करीत प्रथम जमाव पांगवला. नंतर दगडफेक करून झोपडपट्ठीत पांगलेल्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दगडफेकीत सहभागी असलेल्या इतरांचा शोध सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

60% बांधकामे निष्कासित

गरीब नगरमधील 500 अनिधिकृत बांधकामे हटवण्यात येणार आहेत. दोन दिवसात यातील 60 टक्के बांधकामे निष्कासित करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे. ही कारवाई रेल्वेच्या भविष्यातील विस्तारीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या जागेवर पश्चिम रेल्वेचे 5 नवीन प्रकल्प साकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारवाईला धार्मिक रंग

वांद्रेतील गरीब नगरच्या अतिक्रमण कारवाईला धार्मिक रंग दिला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केला आहे. वांद्रे हे काय बांग्लादेशच्या बॉर्डवर आहे का, असा सवाल करीत जर येथील लोक बांगलादशीय होते तर तर भारतात आले कसे, त्यांना मतदान कार्ड, आधारकार्ड व रेशनकार्ड कोणी दिले याची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. त्याचप्रमाणे मंगळवारपासून कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिकांची माथी भडकवण्यात आली. त्यामुळेच आजचा दगडफेकीचा प्रकार घडला. त्यामुळे ज्यांनी या लोकांची माथी भडकवली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT