मुंबई

Vinod Tawde comeback : विनोद तावडे पुन्हा संसदीय राजकारणात, ‘श्रद्धा आणि सबुरी’ला मिळाले फळ!

Rajya Sabha Election : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने विनोद तावडे यांना अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारली. तरीही त्यांनी....

पुढारी वृत्तसेवा

पुढारी वृत्तसेवा : राजकारणाच्या सारीपाटावर अनेकदा 'वेटिंग लिस्ट' लांबते, पण निष्ठा आणि संयम असेल तर विजयाचा गुलाल नक्कीच उधळला जातो. भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्या बाबतीत हेच घडलंय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे डावलले गेल्यानंतरही डगमगून न जाता, 'श्रद्धा आणि सबुरी'ने पक्षकार्य सुरू ठेवणाऱ्या तावडेंचे आता राज्यसभेच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात दिमाखात पुनरागमन झाले आहे.

सन २००० च्या सुमारास महाराष्ट्रात भाजप सत्तेपासून दूर गेला होता. त्यानंतर प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. अशा कठीण काळात विनोद तावडे यांनी पक्षाला आणि कार्यकर्त्यांना ताकदीनिशी सांभाळले. त्यांनी संघ परिवारालाही मोलाचा मदतीचा हात दिला. आता राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने तावडे यांचे संसदीय राजकारणात पुनरागमन झाले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने विनोद तावडे यांना अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारली. तरीही त्यांनी कोणतीही तक्रार न करता पक्षाच्या आदेशाचे पालन केले. त्यांनी आपल्या बोरिवली विधानसभा क्षेत्रात राहून पक्षाचा प्रचार केला. ते सातत्याने पक्ष संघटनेत कार्यरत राहिले. विविध राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी पडद्यामागून संघटना बांधणीची महत्त्वाची भूमिका निभावली. भारतीय जनता पक्षाची बाजू मजबूत करण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले.

चंदीगड महापौरपद आणि हरियाणातील मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे हाताळली. बिहारची निवडणूक देखील त्यांनी समर्थपणे सांभाळली. गेल्या काही दिवसांपासून ते केरळ राज्याची संघटनात्मक जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना आता राज्यसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. "पक्षाने आपल्याबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा," असे सांगत त्यांनी कधीही पदाची मागणी केली नाही. राज्यसभेसाठी नाव चर्चेत येताच, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एकच शंका मांडली. "मला तिथे संसदीय कारकीर्द प्रभावीपणे करता येईल का?" याची खातरजमा त्यांनी शहा यांच्याकडे केल्याचे बोलले जाते.

संसदीय कामकाजात महत्त्वाची भूमिका निभावण्याची तावडे यांची इच्छा होती. "कामकाजात संधी नसेल, तर मी पक्षकार्यातच आनंदी आहे," असे त्यांनी म्हटल्याचे समजते. तावडे यांचे योगदान आणि महाराष्ट्रातील मराठा नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन भाजपने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या पुनरागमनामुळे फडणवीसांच्या तोडीचा आणखी एक नेता महाराष्ट्र भाजपत सक्रिय झाला आहे. विनोद तावडे हे मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासूनचा त्यांचा प्रवास संघ परिवारातील योगदानाचा महत्त्वाचा भाग आहे.

तावडे यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विणून अनेकांना मदत आणि बळ दिले आहे. त्यांच्या याच प्रदीर्घ प्रवासाचे फळ त्यांना आज मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातही विनोद तावडे अत्यंत सक्रिय होते. मात्र, पालघर दौऱ्यात रोख रक्कम सापडल्याच्या प्रकरणामुळे मोठे वादळ निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीत ‘नरेटिव्ह बांधणी’ करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

भाऊसाहेब फुंडकर यांच्यानंतर त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. त्या काळात त्यांनी एक अभ्यासू आणि आक्रमक विरोधी नेता म्हणून ठसा उमटवला. तेव्हापासूनच तावडे राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेतृत्व बनले. ते पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. आता ते दिल्लीत राहून महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडतील. देवेंद्र फडणवीस आणि तावडे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा नेहमीच रंगतात. मात्र, "भाजपमध्ये अशा अफवांना स्थान नसते," असे स्पष्टीकरण या दोघांनीही वारंवार दिले आहे.

तावडे होते केरळमध्ये..

बुधवारी (दि. ४) तावडे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली, तेव्हा ते केरळमध्ये पक्षाने नेमून दिलेल्या कामात व्यस्त होते. गुरुवारी (दि. ५) अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ते मुंबईत येतील आणि अर्ज दाखल करण्यासाठी विधानभवनात जातील. तावडे यांच्या सक्रिय होण्याने संसद सभागृहात, राज्यसभेत भाजपला एक महत्त्वाचा चेहरा मिळणार आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाची बांधणी करण्यासाठी एक ज्येष्ठ नेता पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याचे मानले जाते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT