Vidharbha School Pudhari
मुंबई

Vidharbha School | विदर्भातील शाळा आता २२ जूनपासून: उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकालयाचा निर्णय!

-३० जूनपर्यंत सकाळच्या सत्रात वर्ग भरणार, राज्यातील इतर भागात मात्र १५ जूनलाच वाजणार घंटा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे यापूर्वी निश्चित करण्यात आले होते. मात्र विदर्भातील वाढत्या तापमानाची स्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने नागपूर खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील शाळा एक आठवडा उशिराने, म्हणजे २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण संचालकालयाने मंगळवारी घेतला. त्यामुळे राज्यातील इतर सर्व भागांतील शाळा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १५ जूनपासून सुरू होतील, तर विदर्भातील विद्यार्थ्यांना आणखी आठवडाभराची सुट्टी मिळणार आहे.

शिक्षण संचालकालयाने याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना आदेश जारी केले आहेत. शासनाच्या शालेय सुट्ट्यांबाबतच्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र विदर्भातील तापमान अद्यापही उच्च पातळीवर असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची मागणी विविध स्तरांतून करण्यात येत होती. त्यासंदर्भात नागपूर खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

न्यायालयीन प्रक्रियेचा आणि हवामानाचा विचार करून शिक्षण विभागाने विदर्भातील शाळांच्या प्रारंभाबाबत स्वतंत्र निर्णय घेतला आहे. त्यानुसार विदर्भ विभागातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सोमवार, २२ जूनपासून सुरू होतील. तसेच २२ जून ते ३० जून या कालावधीत विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर १ जुलैपासून शाळा नियमित वेळेनुसार सुरू राहतील.

दरम्यान, राज्यातील उर्वरित भागांमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात नियोजित वेळापत्रकानुसार १५ जूनपासूनच होणार असल्याचे शिक्षण संचालकालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया, पाठ्यपुस्तकांचे वितरण आणि अध्यापनाचे नियोजन पूर्ववत सुरू राहणार आहे. विदर्भासाठीच हा निर्णय लागू राहणार असल्याने तेथील शैक्षणिक वेळापत्रकात आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत.

शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी आणि शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महेश पालकर यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हा आदेश मंगळवारी रात्री करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT