VHP Garba Controversy Pudhari
मुंबई

VHP Garba Controversy: गरबा-दांडियामध्ये मुस्लिमांना प्रवेश नको; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेमुळे राजकीय वाद पेटला आहे. ठाकरे गटासह विरोधकांनी या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: नवरात्रोत्सव काळात गरबा आणि दांडिया यांसारख्या कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये. तसेच हिंदूंच्या ओळख पडताळणीसाठी आधार कार्ड तपासणी आणि कपाळी टिळा लावण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. परिषदेच्या या आवाहनावरून आता राजकीय वादाला तोंड फुटले असून शिवसेना ठाकरे गटासह विरोधी पक्षांनी यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.

गरबा-दांडियासारख्या कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश द्यायचा नाही, असे आम्ही ठरवल्याचे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. नवरात्रीचा उत्सव हा फक्त नाच-गाण्यापुरता मर्यादित नाही. हा सण देवीच्या उपासनेचा आहे. मूर्तिपूजेच्या विरोधात असलेल्या मुस्लिमांनी या सणात का सहभागी व्हावे, असा प्रश्न नायर यांनी उपस्थित केला.

सण हे हिंदूंच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत. त्याचे मूल्य किंवा महत्त्व आम्ही अजिबात कमी होऊ देणार नाही. हे निर्बंध खबरदारीचे उपाय म्हणून अवलंबत असून त्यातून मुस्लिम किंवा इतर कोणत्याही समुदायाला आमचा विरोध नाही, असेही नायर यांनी स्पष्ट केले. जर मुस्लिम आमच्या धार्मिक श्रद्धा आणि उपासना पद्धती मानत नाहीत, तर त्यांच्यासाठी आम्ही नियम शिथिल का करावेत, असा उलट प्रश्नही त्यांनी यावेळी केला.

भागवत यांनी खुलासा करावा

ठाकरे शिवसेनेचे संजय राऊत यांनी परिषदेच्या या भूमिकेला विरोध करत या देशाच्या स्वातंत्र्याच्या तसेच सांस्कृतिक संघर्षात मुस्लिमांचे मोठे योगदान असल्याचे म्हटले आहे. यांचे मोहन भागवत विदेशात जाऊन हिंदू-मुस्लिमांत मतभेद नसावेत अशी भाषणे करतात आणि भारतात त्यांचे लोक अशी विधाने करतात. त्यामुळे भागवतांनीच आता खुलासा करावा, अन्यथा न्यूयाॅर्कमध्ये एक आणि भारतात दुसरी भूमिका चालणार नाही, अशी टीका केली.

विहिंपची भूमिका घटनाविरोधी

काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनी परिषदेची भूमिका घटनाविरोधी असल्याचे म्हटले आहे. सण-उत्सव हे लोकांमधील परस्पर संवाद वाढविण्याचे माध्यम आहे. आम्हाला अनेक मंडळांकडून कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण असते. आम्हीही ईद-रमजानमध्ये अनेकांना निमंत्रित करतो, असे ते म्हणाले.

सरकारने भूमिका स्पष्ट करावी

दरम्यान, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. या प्रकरणी राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

भागवत यांच्या विधानावर भाष्य करणार नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच हिंदू आणि मुस्लिम सलोख्यासंदर्भात अमेरिकेत केलेल्या विधानाबाबत विचारले असता, आम्ही संघाच्या सरसंघचालकांच्या विधानावर भाष्य करणार नाही, असे नायर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT