मुंबई : नवरात्रोत्सवातील गरबा कार्यक्रमांत केवळ हिंदूंनाच प्रवेश द्यावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने शनिवारी केले. गरबा कार्यक्रमात सहभागी होणार्यांची ओळख पटविण्यासाठी आयोजकांनी प्रवेश करणार्यांचे आधार कार्ड तपासावे, असा सल्लाही विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर यांनी दिला आहे. नवरात्रोत्सव 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान होत आहे.
श्रीराज नायर यांनी सांगितले की, गरबा हा केवळ नृत्य नसून, देवीची उपासना आहे. ज्यांचा देवीपूजेवर विश्वास नाही त्यांना यात सहभागी करून घेऊ नये, असे ते म्हणाले. नायर यांनी गरबा सोहळ्यात सहभागी होणार्यांना टिळा लावण्यात यावा आणि प्रवेशापूर्वी त्यांच्याकडून पूजा करून घ्यावी, अशा सूचना गरबा आयोजकांना केल्या असल्याचे नायर यांनी सांगितले. सूचनांचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी विहिंप व बजरंग दलाचे कार्यकर्ते कार्यक्रमांवर लक्ष ठेवतील, असेही नायर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विहिंपच्या या आवाहनाला भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठिंबा दिला. आयोजक समितींना नियम घालण्याचा अधिकार आहे, फक्त कार्यक्रमाला पोलिस परवानगी असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बान यांनी गरबा हा हिंदू उत्सव असल्याचे सांगून इतर धर्मीयांनी त्यात हस्तक्षेप करू नये, असे मत व्यक्त केले.
काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा विरोध
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विहिंपच्या या आवाहनाला जोरदार विरोध दर्शविला. विहिंप समाजात आग लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा उद्देश समाजात धार्मिक फूट पाडून राजकीय फायदा मिळवणे हा आहे, असे ते म्हणाले.