Velhe renamed Rajgad news Pudhari Photo
मुंबई

Velhe renamed Rajgad news: वेल्हे तालुक्याला आता 'राजगड' अशी नवीन ओळख, फडणवीस सरकारचा निर्णय

Rajgad fort Velhe news latest news: येथील नागरिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या भावनिक मागणीला यश, संपूर्ण तालुक्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या वेल्हे तालुक्याच्या इतिहासात एका नव्या सुवर्णपानाचा समावेश झाला आहे. तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची भावनिक मागणी आणि या भूमीचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता, राज्य शासनाच्या महसूल विभागाने वेल्हे तालुक्याचे नाव बदलून 'राजगड तालुका' करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

शासकीय प्रक्रियेला वेग

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि तत्कालीन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने या महत्त्वपूर्ण निर्णयाला मूर्त स्वरूप आले. लवकरच यासंबंधीचे राजपत्र (Gazette) प्रसिद्ध केले जाणार असून, त्यानंतर सर्व शासकीय कामकाजात 'वेल्हे' ऐवजी 'राजगड' या नावाचा वापर सुरू होईल.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय केवळ प्रशासकीय बदल नसून, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला दिलेला मानाचा मुजरा आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या नावाने तालुक्याची ओळख निर्माण व्हावी, ही जनतेची इच्छा होती. ती पूर्ण करू शकलो, याचा मला मनस्वी आनंद आहे," असे त्यांनी सांगितले.

लोकशाही प्रक्रियेचा सन्मान

या नामांतराच्या निर्णयामागे एक भक्कम लोकशाही प्रक्रिया आहे. या बदलासाठी स्थानिक पातळीवरून मोठा पाठिंबा मिळाला होता. वेल्हे तालुक्यातील एकूण ७० पैकी तब्बल ५८ ग्रामपंचायतींनी नाव बदलण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला होता. पुणे जिल्हा परिषदेनेही या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देत शासनाकडे पाठवला होता. राज्याच्या प्रस्तावाला ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारनेही हिरवा कंदील दाखवला, ज्यामुळे हा निर्णय घेणे शक्य झाले.

ऐतिहासिक वारसा आणि भविष्यातील अपेक्षा

राजगड किल्ला हा केवळ एक पर्यटनस्थळ नसून, तो स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मानबिंदू आहे. या निर्णयामुळे तालुक्याची ओळख थेट या गौरवशाली इतिहासाशी जोडली गेली आहे. या नव्या ओळखीमुळे केवळ नागरिकांमध्ये अभिमानाची भावनाच वाढणार नाही, तर 'राजगड' या नावामुळे पर्यटन आणि परिसराच्या विकासालाही नवी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने स्थानिकांनी शासनाचे आभार मानले असून, या ऐतिहासिक बदलाचे स्वागत केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT