नवी मुंबई : सततच्या पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक घटली आहे. त्यात सोमवारपासून पितृपंधरवडा सुरू झाल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुठवठा कमी असल्याने भाज्या महागल्या आहेत.
घाऊक बाजारात वाटाणा 130, गवार 70 तर फरसबी 60 रुपये किलो वर दर गेले आहेत. गणेशोत्सवात 40 ते 50 रुपये किलोच्या घरात असलेल्या भाज्या किरकोळ बाजारात आता 80 ते 100 रुपये किलोवर गेल्या आहेत. पितृपंधरवाडा असल्यानेे नाईलाजास्तव खरेदी करावी लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. तर व्यापार्यांच्या मते हे दर पुढील काही दिवस चढेच राहणार आहेत.
एपीएमसी बाजारात नियमित 600 भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक होत असते. आता बाजारात फक्त 400 ते 450 गाड्यांची आवक होत आहे. एकीकडे आवक कमी असताना भाज्यांना मोठी मागणी आहे. पितृपक्षात वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात. त्यात प्रामुख्याने गवार, भोपळा, चवळी, भेंडी, तोंडली, शेवगा, घेवडा या भाज्या लागतात. त्यामुळे त्यांना मागणी आहे. आवक कमी असल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या नाशिक, सातारा, पुणे येथून भाज्या बाजारात येत आहे. पावसामुळे भाज्या खराब होत असल्याने त्यांच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. त्यात घाऊक बाजारापेक्षा दुप्पटीपेक्षा अधिक दराने किरकोळ बाजारात भाज्यांची विक्री केली जात आहे.
वाटाणा 130 रुपयांवर
उत्तरांखड, हिमालच प्रदेश, पंजाब येथून एपीएमसी बाजारात वाटाण्याची आवक होत आहे. येथे मोठया प्रमाणात पाऊस सुरु असल्यामुळे आवक कमी झाली असून दर वाढले आहे. एपीएमसीत 60 ते 130 रुपये किलो वाटाण्याला दर मिळत आहे.
घाऊक दर प्रतिकिलो
काकडी 14 ते 20
टॉमटो 16 ते 20
फरसबी 50 ते 60
शेवगा 30 ते 40
गाजर 16 ते 18
वाटणा 60 ते 130
फ्लॉवर 12 ते 14
वांगी 20 ते 24
गवार 60 ते 70
दुधी 30 ते 40
पालक 8 ते 10
मेथी 7 ते 8
एपीएमसी बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर देखील वधारले आहेत. डिसेंबर महिन्यापर्यंत भाज्यांचे दर तेजीतच राहतील.के.डी.भाळके, व्यापारी एपीएमसी मार्केट