मुंबई : राजेश सावंत
लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना, दोन्ही बाजूला अनधिकृत झोपडपट्टी, कचरा, भंगार दिसून येते. पण मध्य रेल्वेने राबवलेल्या अनोख्या उपक्रमामुळे मार्गालगत भाज्यांचे मळे फुलले आहेत. यात मोठ्या प्रमाणात अळूची लागवड करण्यात आली असून संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे.
मुंबईत जागा दिसेल तिथे झोपडी उभी करणे हा व्यवसाय बनला आहे. यात रेल्वे मार्गही सुटलेले नाहीत. त्यामुळे या अनधिकृत झोपड्या हटवण्यासाठी रेल्वेचा पैसाच खर्च होत नाही तर अधिकारी कर्मचाऱ्यांचा वेळही वाया जात आहे. हे अनधिकृत बांधकाम कसे रोखावे यासाठी मध्य रेल्वेने एक अनोखी युक्ती लढवली आहे.
रेल्वे मार्गालगत असलेल्या मोकळ्या जमिनीवर शेती करण्याचा उपक्रम राबवला आहे. जेथे शक्य असेल तेथे विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमधून प्रवास करत असताना अनेक ठिकाणी भाज्यांचे मळे फुललेले दिसून येतात. परळ रेल्वे स्टेशनपासून जवळच मोठ्या प्रमाणात भाज्यांची लागवड करण्यात आली असून यात अळूचे मोठ्या प्रमाणात पीक घेण्यात आले आहे.
हे पीक पावसाळ्यात घेण्यात येत असल्यामुळे पाण्याचीही गरज भासत नाही. सणासुदीचे दिवस सुरू होत असल्यामुळे अळूच्या वड्या बनवण्यासाठी त्याच जातीचे अळू रेल्वे मार्गालगत लावण्यात आले आहे. या अळूच्या पानांमुळे संपूर्ण परिसर हिरवा गार झाला आहे. भाज्यांची शेती करण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्याच चतुर्थश्रेणी कामगारांना मोकळी जागा उपलब्ध करून दिली आहे.
या जागेत भाज्यांची शेती करून, त्याची दादरसह अन्य मार्केटमध्ये विक्री करण्याची जबाबदारी त्या चतुर्थश्रेणी कामगारांची असते. यातून मिळणारे उत्पन्नही तेच कामगार घेत असल्याचे रेल्वेचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे रेल्वेत काम करत असताना, भाज्यांचेही अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्यामुळे चतुर्थ श्रेणी कामगारही खूश आहेत
अनधिकृत कामाला आळा घालण्यासाठी उपक्रम
रेल्वे मार्गालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्यांसह अन्य अतिक्रमण होते. त्याशिवाय अनेक जण कचराही टाकतात. त्यामुळे मोकळ्या जागेत शेती करून, या जागा संरक्षित करण्यात आल्या. त्याशिवाय प्रवास करतानाही प्रवाशांना एक सुखद आनंद मिळत असल्याचे मत रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले.
पिकांचे प्रकार
पालेभाज्या : पालक, मेथी, शेपू, अळू मुळभाज्या : मुळा आणि कांदापात कोथिंबीर, कढीपत्ता, वालीच्या शेंगा व अन्य पावसाळी भाज्या