नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात एक धक्कादायक आणि तितकाच अमानवी प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयाच्या शवागृहात एका २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना, तेथील एका कर्मचाऱ्याने मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडाच्या नावाखाली तिच्या नातेवाईकांकडून तब्बल दोन हजार रुपयांची लाच उकळल्याची संतापजनक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पीडित तरुणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी शवागृहातील कर्मचाऱ्याने "कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो," असे सांगत नातेवाईकांकडे पैशांची मागणी केली. धक्कादायक बाब म्हणजे त्याने दोनशे-पाचशे नव्हे, तर थेट दोन हजार रुपयांची मागणी केली आणि ती स्वीकारली. हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहे. या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.
या घटनेमुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर आणि रुग्णालयातील गैरप्रकारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा घटना यापूर्वी केवळ ऐकिवात होत्या, मात्र आता फुटेजच्या रुपात ठोस पुरावा समोर आल्याने प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. या अमानवी कृत्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.