मुंबई : देशाचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीला 150 वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ या गीताच्या सगळ्या कडव्यांचे गायन करण्याचे आणि गीताचा इतिहास सांगणार्या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे, भाजपने या दोन्ही आमदारांवर हल्लाबोल केला असून,त्यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला आहे.
शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव अ. रा. कुलकर्णी यांनी शिक्षण आयुक्तांना यासंदर्भातील सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. वंदे मातरम् गीताच्या 150व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील राजमाता जिजाबाई ट्रस्टतर्फे शिक्षण विभागाला पत्र देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य मंडळाच्या शाळांना सध्या दिवाळीची सुट्टी संपून 3 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. तथापि, सीबीएसई, आयसीईएसई अशा अन्य मंडळांशी संलग्न शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दुसर्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच शाळांमध्ये उपक्रम आयोजित करावा लागणार आहे.
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे पूर्ण गायन करण्याची राज्यातील सर्व शाळांवर केलेली सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे मुंबईतील आमदार अबू आझमी आणि भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षण मंत्र्यांना केली आहे. सरकार गुणवत्तापूर्ण शिक्षणाऐवजी ज्ञानाच्या क्षेत्रात धार्मिक मुद्दे आणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सांस्कृतिक अजेंडा रेटत असल्याचा आरोप या दोन्ही आमदारांनी केला आहे.
‘वंदे मातरम्’ला अबू आझमी आणि रईस शेख यांचा एवढा विरोध कशासाठी, असा सवाल करून त्यांना या देशात राहून वंदे मातरम् म्हणायचे नसेल तर त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, अशा शब्दांत भाजपने या दोन्ही आमदारांवर निशाणा साधला आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी दोन्ही आमदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.