मुंबई : पुण्यातील मुळशीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची धाकटी सून वैष्णवी हगवणे यांनी जीवन संपवले नसून त्यांची हत्या आहे. वैष्णवी यांचा मृत्यू हा कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीच्या अत्याचारामुळेच झाला असल्याचा चौकशी अहवाल महिला व बालहक्क समितीने विधानसभेत नुकताच सादर केला आहे. त्यांनी जीवन संपवले नसून, तो हुंडाबळीचा प्रकार आहे. या दिशेने पोलिसांनी तपास करावा, असेही या अहवालात म्हटले आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये 16 सदस्य आमदार आहेत.
राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांचा धाकटा मुलगा शशांक याची पत्नी वैष्णवी हिने जीवन संंपवल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक आणि तिची सासू आणि नणंद यांना अटक केली आहे.
महिला व बालहक्क समितीच्या अहवालात हगवणे प्रकरणातील तपासाचे निष्कर्ष, यातील आरोपींना शिक्षा व पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासह राज्यातील यंत्रणा व व्यवस्थेच्या अंमलबजावणीतील त्रुटी व त्यावरील उपाययोजनांबाबत शिफारशी केल्या आहेत. भाविष्यात, पीडित महिलांना मदत मिळावी, यासाठी राज्य महिला आयोगाला न्यायालयीन अधिकार देण्याचा विचार करावा, या शिफारशीचाही अहवालात समावेश आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी सुपेकर यांच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक विभागाकडून सत्यता पडताळून घ्यावी. त्यात तथ्य असल्यास सुपेकर यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा. या प्रकरणात सुपेकर यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग स्पष्ट असतानाही त्यासंदर्भात कोणतीही कारवाई पोलिस विभागाकडून करण्यात आलेली नाही, हे गंभीर व आक्षेपार्ह आहे.
मयुरी हगवणे प्रकरणाची वेळेत गंभीर दखल घेतली असती, तर कदाचिक वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण टाळता आले असते, असे मत समितीने व्यक्त केले आहे. तसेच, मयुरी हगवणेंच्या तक्रारीची दखल न घेणार्या पोलिस अधिकार्यांवर सक्त कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या मुलाचा ताबा वैष्णवीयांच्या आई-वडिलांकडेच ठेवावा, यासाठी महिला व बालकल्याण विभागाने कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केली.
पुराव्यांसह चार्जशिट दाखल करावी.
वरिष्ठ पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या चौकशीची आवश्यकता.
सुपेकर यांना तपासापासून दूर ठेवा.
त्यांचा सहभाग आढळल्यास निलंबित करून सहआरोपी करा.
हुंडा रूपात ब्रँडेड गाडी, चांदीची भांडी, सोने, रोख रक्कम घेतल्याचे सबळ पुरावे.
सुपेकर यांच्या पत्नीने रुखवताच्या निमित्ताने हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचे दिसून येत असल्याने सुपेकर यांच्या पत्नीला या प्रकरणात सहआरोपी करा.
तपास तातडीने पूर्ण करा. आरोपी आणि सहआरोपी सुटणार नाहीत याची दक्षता घ्या.