मुंबई : ‘पुढारी न्‍यूज’च्‍या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त हाॅटेल ट्रायडेंटमध्ये मंगळवारी आयोजित महाराष्‍ट्र जेन नेक्‍स्‍ट 'महासमिट २६'चे उद्‍घाटन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीप प्रज्‍वलनाने केले. याप्रसंगी ‘पुढारी’ माध्‍यम समूहाचे मुख्‍य संपादक आणि चेअरमन इमेरिटस्‌ डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’ माध्‍यम समूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव, ‘पुढारी’च्‍या संचालक सौ. गीतादेवी जाधव, ‘पुढारी’च्‍या संचालक सौ. स्‍मितादेवी जाधव, ‘पुढारी’च्‍या संचालक सौ. शीतल पाटील, ‘पुढारी’चे संचालक ऋतुराज पाटील उपस्‍थित होते.  (छाया : मृगेश बांदिवडेकर)
मुंबई

Pudhari Mahasummit| भारताच्या महाशक्तीत वाढवण बंदराचा वाटा मोठा असेल

‘पुढारी महासमिट’मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास : कुंभमेळ्‍यातून नाशिक होणार ग्रोथ सेंटर

पुढारी वृत्तसेवा

गौरीशंकर घाळे

मुंबई : ‘ज्याच्याकडे मेरिटाईम पॉवर म्हणजे सागरी शक्ती, तोच व्यापाराचा राजा’ या न्यायाने पालघर जिल्ह्यात उभारण्यात येणारे वाढवण बंदर हे जगातील टॉप टेन बलाढ्य बंदरांपैकी एक असेल आणि त्‍यामुळेच महाराष्ट्र मेरिटाईम पॉवर बनेल. पुढच्या २५-३० वर्षांत लोक भारताकडे महाशक्ती म्हणून पाहतील, तेव्हा त्‍यात सगळ्‍यांत मोठा वाटा एकट्या वाढवण बंदराचा असेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

‘पुढारी न्यूज’ वृत्तवाहिनीच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘महासमिट २०२६’च्या उद्‌घाटन सोहळ्‍यात मुख्यमंत्री बोलत होते. ‘पुढारी न्यूज’चे संपादक प्रसन्न जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणावर भाष्य करताना नाशिकच्या कुंभमेळ्‍यासाठी हाती घेतलेली कामे ही तात्‍पुरती नाहीत. नाशिकला ग्रोथ इंजिन म्हणून पुढे आणण्यासाठी ५० वर्षांच्या व्हिजनवर तिथे काम सुरू आहे, याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या मूळ ग्रोथ इंजिनपैकी एक असलेल्या कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे. त्‍याशिवाय कोल्हापूरचे ग्रोथ इंजिन पुढे जाणार नाही, असे ठामपणे सांगतानाच कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या मुद्द्यावर आता ‘पुढारी’नेच पुढाकार घ्यावा, असा आग्रहदेखील मुख्यमत्र्यांनी केला.

‘पुढारी न्यूज’च्या ‘महासमिट २०२६’निमित्त मंगळवारी दिवसभर चाललेल्या महाचर्चेचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रदीर्घ मुलाखतीने झाला. राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सर्व विषयांवर मुख्यमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी करत सांगितले की, २०२९ पर्यंत मी महाराष्ट्रातच असेन. भारतात पंतप्रधानपदाची जागा रिक्त नाही. २०२९ ला नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्‍यांच्या होणार्‍या राजकीय चर्चाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निरर्थक ठरवल्या. एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जोपर्यंत आमच्या नेत्यांना भेटताहेत, तोपर्यंत काळजीचे कारण नाही. उलट त्‍याचा आम्हाला आनंदच आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेली ही प्रश्नोत्तरे-

प्रश्न : राज्याच्या विकासाच्या अनुषंगाने काही प्रश्न आहेत. रस्ते, समृद्धी महामार्ग तुम्ही बनवले. आता शक्तिपीठाच्या दिशेने आपण वाटचाल करत आहात. अशावेळी नाशिकचे खड्डे, चाकणचा प्रश्न, कोल्हापूरमध्येही असेच काहीसे बघायला मिळते. प्रशासन आणि स्थानिक नेतृत्वामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या ‘व्हिजन’मध्ये ब्रेक लागतो का?

मुख्यमंत्री फडणवीस : नाशिकमधला प्रश्न इतकाच आहे की, तिथे एकावेळी खूप कामे सुरू केली. आपल्याला कुंभमेळ्याच्या आधी हे सगळे काम संपवायचे आहे. ते काम आम्ही पूर्ण करू, खड्डेदेखील मुजवू. मला विश्वास आहे की, कुंभमेळ्याच्या आधी आपल्याला अतिशय चांगले नाशिक पाहायला मिळेल. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याच्या पुढच्या ५० वर्षांच्या व्हिजनवर आपले काम सुरू आहे.

नाशिकला ग्रोथ इंजिनमध्ये परिवर्तित करायचे असल्याने जवळपास ३४ हजार कोटी रुपयांची कामे आम्ही करतो आहोत. पण यातली ८५ ते ९० टक्के कामे स्थायी आहेत. एका नाशिक रिंग रोडमुळे नाशिकच्या जीडीपीमध्ये १ ते २ टक्क्यांची भर पडणार आहे. हा एक रिंग रोड नाशिकमध्ये २ ते ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणेल. त्यामुळे कुंभमेळ्याची एक संधी घेऊन आम्ही हे सगळे काम चालविले आहे. हे काम करताना काही अडचणी येतात. म्हणूनच मी परवा लोकांची माफीदेखील मागितली. तसेच चाकणच्या संदर्भात आहे. मुळामध्ये एमआयडीसीला औद्योगिक नगरीमध्ये परिवर्तित करणे गरजेचे आहे. पुण्यामध्ये चाकणच नाही, हिंजवडीचाही प्रश्न आहे. आता हिंजवडीच्या संदर्भातही लवकरच निर्णय करून हिंजवडीचा हा सगळा भाग आम्ही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे देणार आहोत. जेणेकरून तिथला परिसरही चांगला होईल.

प्रश्न : सरकारच्या पुढच्या काळासाठी तुमचा ॲक्शन प्लॅन काय आहे? तुम्ही तुमच्यासाठी कोणती उद्दिष्टे निर्धारित केली आहेत?

मुख्यमंत्री फडणवीस : आमच्या पहिल्या दीड वर्षामध्ये पहिल्यांदा मी प्रशासकीय सुधारणा केल्या. १५-२० लाख कर्मचाऱ्यांची आपली शासकीय व्यवस्था आहे. आमचा ‘एचआर विभाग’ सर्वात कमकुवत होता. मनुष्यबळ विकासात सुधारणा करून देशामध्ये पहिल्यांदा एचआर स्टॅक तयार केला. मागच्या काळात डिजिटल सेवांकडे वळलो. ११०० शासकीय सेवा ऑनलाईन केल्या. आपल्या ११०० सेवांपैकी २५-३० सेवा आणि २०-२५ योजनांसाठी ९० टक्के लोक अर्ज करत असतात. त्यामुळे त्‍या अधिक सक्षम करू. या ज्या सेवांकरिता ९० टक्के लोकांना सरकारी कार्यालयात जावे लागते, त्या पूर्णपणे ‘सीमलेसली’ घरबसल्या आणि डिजिटल स्वरूपात मिळतील, अशी पूर्ण व्यवस्था उभी केली आहे.

महाराष्ट्र ग्रोथ इंजिन

शेतीमध्ये आपण महाविस्तार ॲपच्या माध्यमातून एआय आणलेला आहे. हा देशातला सर्वात चांगला ॲप आहे, ज्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये शेतीमध्ये शाश्वतता आणता येणार आहे. ५० लाख शेतकरी हे या ॲपवर आलेले आहेत. पुढच्या काळामध्ये उत्पादकता वाढवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे हे काम हातामध्ये घेतले आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये आज आपण देशातले लीडर आहोत. विशेषतः फिनटेकमध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक आपल्याकडे आहे. जीसीसीमध्ये एक मोठी इकोसिस्टीम आपण तयार करतो आहोत. मागच्या वर्षी सगळ्यात जास्त जीसीसी आपल्याकडे आले आहेत. त्यामुळे सेवा क्षेत्रामध्ये नवनवीन संधी तयार करायचा प्रयत्न आहे. त्यासोबत उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. एक प्रकारे देशाचे मॅन्युफॅक्चरिंगचे ग्रोथ इंजिन महाराष्ट्र झाला आहे. देशात येणारी सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. सर्वात जास्त डेटा सेंटर महाराष्ट्रामध्ये तयार होतात. सर्वात जास्त स्टार्टअप्स हे महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्र हा स्टार्टअप कॅपिटल झालेला आहे. सर्वाधिक युनिकॉर्न्स महाराष्ट्रात आहेत.

विकसित महाराष्ट्राचे चित्र

पायाभूत विकास आणि धोरण आधारित औद्योगिकीकरण या दोन आधारांवर आमचे काम सुरू आहे. जवळपास २५ धोरणे आपण तयार केली असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. इंडस्ट्रीचे क्षेत्र बदलते आहे. आता स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगकडे जग वळले आहे. पुढच्या काळामध्ये संपूर्ण डीप टेक, फ्रंटिअर तंत्रज्ञान याच्यावर फोकस करणे गरजेचे आहे. क्वांटमवर फोकस करणे गरजेचे आहे. क्वांटममध्ये ह्युमन रिसोर्स तयार करण्याची सुरुवात केली. पुढच्या पाच वर्षांत क्वांटमसाठी लागणारे मनुष्यबळ आपण तयार करतो आहोत. मोठ्या प्रमाणात आपल्या आयटीआयला उद्योगांशी जोडतो आहोत. या उद्योगांना आवश्यक असलेले मनुष्यबळ तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. यंदाच्या पहिल्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था ही ७.८ टक्क्यांनी विकसित झाली आहे आणि महाराष्ट्राची ८.८ टक्क्यांनी विकसित झाली आहे. त्यामुळे आपल्या विकासाचा दर हा वेगाने पुढे चालला आहे. याच काळात जगातल्या इतर देशांच्या विकासाचा वेग ३ ते ४ टक्केच आहे, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे!

प्रश्न : मुंबई, नाशिक आणि पुणे या सुवर्ण त्रिकोणाकडे लक्ष आहे हे तर लक्षात आले. पण त्यापलीकडेही प्रश्न आहेत. आमच्या कोल्हापूरमध्येसुद्धा हद्दवाढीसारखे प्रश्न आहेत. त्यांचे काय?

मुख्यमंत्री फडणवीस : कोल्हापूर हे आपले ओरिजनल ग्रोथ इंजिन आहे. ज्या काळामध्ये महाराष्ट्राचे औद्योगिकीकरण सुरू झाले, तेव्हा ज्या सुरुवातीच्या औद्योगिक वसाहती होत्या त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. विशेषतः फाऊंड्रीमध्ये तर आजही कोल्हापूरसारखे काम इतर ठिकाणी होत नाही. त्यामुळे कोल्हापूरकडे आमचे निश्चितपणे लक्ष आहे. मुंबई ते बंगळूर कॉरिडॉर आपण करतो आहोत. या कॉरिडॉरचा मोठा फायदा कोल्हापूरला होणार आहे. कोल्हापूरमध्ये आता चांगली गुंतवणूक येत आहे. त्यासाठी आवश्यक गोष्टी आम्ही देतो आहोत. पण हद्दवाढीचा मुद्दा आपण सांगितला. तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. कोल्हापूर शहर हद्दवाढ झाल्याशिवाय हे शहर नव्याने ग्रोथ इंजिन होऊ शकत नाही. त्यामुळे त्याची हद्दवाढ ही झालीच पाहिजे. त्यासाठी आम्ही अनेक सवलती द्यायला तयार आहोत.

हद्दवाढीनंतर पाच वर्षांपर्यंत कर वाढवणार नाही, हे आम्ही सांगितले आहे. आपण कोल्हापूरमध्ये हायकोर्टाचे सर्किट बेंच आणले. त्या एका हायकोर्टच्या बेंचमुळे तिथे येणाऱ्यांची संख्या लाखांनी वाढणार आहे. आपण कोल्हापूरचा विस्तार केला नाही, तर या आपल्या मूळ ग्रोथ इंजिनची वाढ खुंटेल, अशी मला शंका आहे. पण, मला विश्वास आहे की, जर सगळ्यांनी मिळून याबाबत निर्णय केला, तर कोल्हापूरला फार काही वेगळे करायची आवश्यकताच नाही. कोल्हापूरचे वातावरण, कोल्हापूरमध्ये असलेले रिसोर्सेस, कोल्हापूरमध्ये असलेली साधन संपत्ती, कोल्हापुरात असलेले पाणी या सगळ्यांच्या भरवशावर कोल्हापूर हे ग्रोथ इंजिन कालही होते, आजही आहे आणि उद्याही अधिक चांगले आपण करू शकतो. त्याबद्दल मी वारंवार कोल्हापूरला जाऊन सांगतो देखील. कदाचित, आता दै. ‘पुढारी’च त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन निर्णय करू शकेल, असे मला वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT