मुंबई : राज्यातील बीबीए, बीसीए आणि बीएमएस अभ्यासक्रमांतील हजारो जागा रिक्त राहण्याची भीती लक्षात घेता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अतिरिक्त सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, शनिवारी पार पडलेल्या या परीक्षेला अपेक्षित प्रतिसाद मिळूनही जागा भरण्याचे चित्र दिसत नाही. त्यामुळे, अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा आवश्यक आहे का, यावर पुन्हा एकदा सवाल उपस्थित होत आहे.
राज्यात बीबीए, बीसीए आणि बीएमएस अभ्यासक्रमांसाठी एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. परंतु यासाठी घेण्यात येणार्या सीईटीला विद्यार्थी फारसा प्रतिसाद देत नसल्याचे चित्र गेल्या वर्षापासून स्पष्ट होत आहे. यंदाही दोन वेळा सीईटी घेतली गेली तरी जागा रिक्तच राहण्याची शक्यता कायम आहे.
एप्रिलमध्ये झालेल्या पहिल्या सीईटीसाठी 72 हजार 259 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, केवळ 61 हजार 666 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. ही आकडेवारी पाहता, प्रवेशप्रक्रियेत अपेक्षित जागा भरणार नाहीत हे लक्षात घेवून संस्था चालकांच्या मागणीनुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अतिरिक्त सीईटीचा निर्णय घेतला.
शनिवारी झालेल्या या अतिरिक्त परीक्षेसाठी 40 हजार 667 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 32 हजार 839 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. एप्रिलमध्ये सीईटी दिलेल्यांपैकी बरेच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असण्याची शक्यता आहे. तसेच प्रवेश उशिरा होत असल्याने अन्य अभ्यासक्रमात वळले असण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
या परीक्षेचा कोणताही ठोस परिणाम दिसून न आल्याने काही महाविद्यालयांकडून ‘या अभ्यासक्रमांसाठी सीईटी रद्द करा’, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पारंपरिक विद्यापीठांतील या अभ्यासक्रमांना अद्यापही प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेणे गरजेचे वाटत नाही, असे मत अनेक शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.