बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतालाच पहिली पसंती! pudhari photo
मुंबई

Foreign investment India : बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतालाच पहिली पसंती!

17 देशांतील 1,200 कॉर्पोरेट कंपन्यांच्या सर्वेक्षणात 40 टक्के कंपन्यांना उद्योग विस्तारासाठी भारत हवा!

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः राजेंद्र जोशी

अमेरिकन टॅरिफ आणि एच-1 बी व्हिसाची शुल्कवाढ, यामुळे भारतीय बाजारात अस्वस्थतेचे वातावरण असले, तरी जगातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उत्पादन विस्तारासाठी भारताला सर्वाधिक पहिली पसंती दिली आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचा ‘फ्यूचर ऑफ ट्रेड ः रेजिलियन्स’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात भारतीय बाजारपेठ आणि औद्योगिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या वतीने जगातील 17 देशांतील तब्बल 1 हजार 200 वरिष्ठ कॉर्पोरेट अधिकार्‍यांच्या सर्वेक्षणावर आधारित हा अभ्यास अहवालाद्वारे स्पष्ट करण्यात आला आहे. यामध्ये 40 टक्क्यांहून अधिक कंपन्या भारतातील आपली व्यावसायिक हालचाल वाढविण्याच्या तयारीत आहेत. यामागे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आणि सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी भारत हे प्रमुख कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

भारत हा सर्वेक्षणातील आघाडीची बाजारपेठ असून, जवळपास 50 टक्के कंपन्या व्यापार क्रियाकलाप वाढविण्याच्या किंवा टिकविण्याच्या विचारात आहेत. विशेषतः, अमेरिका, ब्रिटन, चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरमधील 60 टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी भारताशी व्यापारवृद्धीचा मानस व्यक्त केला आहे.

जागतिक पातळीवर सध्या रशियन ऑईल खरेदीच्या मुद्द्यावरून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष भारताची कोंडी करू पाहत आहेत. भारतावर अन्यायकारक 50 टक्क्यांचे आयात शुल्क लादल्यानंतर त्यांनी अमेरिकेत भारतातून येणारे बुद्धिवान मनुष्यबळ रोखण्यासाठी एक-1 बी व्हिसाच्या एकरकमी शुल्कामध्ये तब्बल 1 लाख डॉलरपर्यंत वाढ केली.

याखेरीज युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाला भारताबरोबर व्यापारी संबंध तोडण्यासंदर्भात धमकीवजा आदेशही देण्यात आले. या पार्श्वभूमीवर जगातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्या भारताबरोबर व्यापार करण्यास आणि भारतामध्ये उद्योग उभारण्यास प्रथम पसंती देतात, या गोष्टीला जागतिक पातळीवर वेगळे महत्त्व आहे.

अहवालानुसार, परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी भारताने राबविलेल्या सुधारणांमुळे देश ‘व्हॅल्यू चेन’मध्ये वरच्या पायरीवर पोहोचला आहे. बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग म्हणून भारताच्या असलेल्या भूमिकेचे रूपांतर आता ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरमध्ये (जीसीसीएस) झाले असून, ते बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यपद्धतीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

‘नॅसकॉम’च्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या 1 हजार 760 जीसीसी कार्यरत आहेत. पुढील वर्षापर्यंत त्यांची संख्या 2 हजारांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. रिटेल, अ‍ॅटोमोबाईल, हेल्थकेअर आणि बँकिंगसह विविध क्षेत्रांतील प्रगत तंत्रज्ञान, उत्पादन, संशोधन विकास, डिझाईन व अ‍ॅनालिटिक्समध्ये ही केंद्रे महत्त्वाचे योगदान देत आहेत.

आशियाच व्यापार वृद्धीचे केंद्र

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने आपल्या अहवालात पुढील तीन ते पाच वर्षांत आशिया व्यापारवृद्धीचे प्रमुख केंद्र राहील, असे नमूद केले आहे. मध्य पूर्वेचा उदय होणार असला, तरी अमेरिका आणि चीन हे जागतिक पुरवठा साखळीत प्रमुख खेळाडू राहतील, असेही नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT