मुंबई : युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयद्वारे व्यवहार करण्यासाठी हाताच्या बोटांचे ठसे (बायोमेट्रिक) आणि फेसरीडिंगचाही पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रणालीची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून होईल.
यूपीआय व्यवहार करताना सध्या वापरकर्त्यांना पिन क्रमांक टाकणे आवश्यक असते. आता हाताचे बोटांचे ठसे आणि वापरकर्त्याचा चेहरा व्यवहार करण्यासाठी वापरता येईल. आधार कार्डचा डेटा या प्रणालीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित होतील. यूपीआय व्यवहार पूर्णत्वास नेण्यासाठी पिन क्रमांकाव्यतिरिक्त इतर पर्याय वापरकर्त्यांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मार्गदर्शक सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) केली आहे. त्याचाच भाग म्हणून नवीन पर्याय उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती या विषयाशी संबंधित अधिकार्यांनी माध्यमांना दिली.
द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यूपीआय चालवते. मुंबई येथे सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक महोत्सवात ही प्रणाली सादर करण्याची एनपीसीआयची योजना आहे. एनपीसीआयने या वृत्ताला तातडीने दुजोरा दिलेला नाही. रॉयटर्सने या बाबतचे वृत्त दिले आहे.