Ganpati Mumbai DEEPAK SALVI
मुंबई

Mumbai Ganesh Festival: मुंबईतील या सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाला गोड गणपती का म्हणतात?

Mumbai Ganpati Famous Pandals to Visit: प्रतिष्ठित गणेशमूर्तींपासून ते अनोखे देखावे आणि उत्साही उत्सवांपर्यंत, प्रत्येक मंडळ स्वतःचे एक वेगळेपण जपते.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Ganpati Famous Pandals to Visit

संकलन : स्वप्निल कुलकर्णी

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ एक उत्सव नाही; ती एक भावना आहे जी या शहराला भक्ती, सर्जनशीलता आणि आनंदाने एकत्र करते. प्रतिष्ठित गणेशमूर्तींपासून ते अनोखे देखावे आणि उत्साही उत्सवांपर्यंत, प्रत्येक मंडळ स्वतःचे एक वेगळेपण जपते. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मुंबईतील गणेशोत्सवामधील रंजक आणि अनोख्या गोष्टींचा घेतलेला हा मागोवा.

केशवजी नाईक चाळीत सार्वजनिक गणेश उत्सवाचा ‘श्री गणेशा’

लोकमान्य टिळकांनी 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याच वर्षी मुंबईतील गिरगावात केशवजी नाईक या चाळीत सार्वजनिक गणेशमुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. या चाळीत साजरा होणारा गणेशोत्सव सुरूवातीपासून पर्यावरणपूरक होता. श्रींची मूर्तीदेखील लहान आकाराचीच असे. केशवजी नाईक चाळीत लोकमान्य टिळकांचे रावबहाद्दुर लिमये आणि नरहरिश्तरी गोडसे हे अनुयायी होते. त्यामुळे लोकमान्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद देत या चाळीत गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. त्यांनी पुढाकार घेऊन या उत्सवाचे नियोजन केले.

गणेशोत्सवात दगड का मारले जात?

मुंबईतील सार्वजनिक गणपतीच्या वर्णनांमध्ये माडगांवकरांसह अनेक लेखकांनी एका वेगळ्या प्रथेचे वर्णन केले आहे. काही खोडकर लोक इतरांच्या घरांवर आणि येणार्‍या-जाणार्‍यांवर दगड मारत असत. चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनाचा आळ दूर करण्यासाठी हे दगड मारले जात पण त्याला वेगळं रुप देऊन काहींनी लोकांवरच दगड मारायला सुरुवात केली होती. त्यामुळे वाणी, पारशी, गुजराती लोकांनी ‘ढगळा चोथ म्हणजे दगड मारायची चतुर्थी’ असे नाव या दिवसाला दिले होते.

अखिल चंदनवाडीच्या बाप्पाला गोड गणपती का म्हणतात?

मुंबईतील अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाचा गणपती ‘गोड गणपती’ म्हणून प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी एका भक्ताने आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी या बाप्पाकडे नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यावर त्याने गणपती बाप्पाला साखर अर्पण करण्याचे वचन दिले. नवस पूर्ण झाल्यावर त्याने बोलल्याप्रमाणे बाप्पावर साखरेचा वर्षाव केला. ही घटना पाहून इतर भाविकांनीही याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. याच परंपरेमुळे या गणपतीला गोड गणपती असे नाव पडले आहे. या प्रथेवर काहींनी आक्षेप घेतला होता. मंडळाने यावर एक उपाय शोधून काढला. अर्पण केलेली साखर दुसर्‍या दिवशी नारळासोबत चंदनावाडीतील रहिवाशांना प्रसाद म्हणून वाटली जाते.

उंच मूर्तींचा असा रचला पाया

गणरायांच्या उंच मूर्तींचा खरा पाया रचला गेला तो गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये. प्रख्यात मूर्तीकार मास्टर दिनानाथ वेलिंग यांनी 1977 मध्ये मुंबई आणि देशातील सर्वात मोठी आणि उंच अशी कमळावर विराजमान झालेली गणेशमूर्ती साकारली.

मास्टर वेलिंग यांनी गणेशगल्ली मंडळासाठी 1977 ते 1989 या 13 वर्षात वेगवेगळ्या रुपातील 22 फुटी गणेशमूर्ती साकारल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT