What is Mumbai Integrated Tunnel Road Network Project
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी (इंटिग्रेटेड भुयारी रोड नेटवर्क) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यमान रस्ते नेटवर्क आणि जलद गतीने विस्तारत असलेल्या मेट्रो रेल्वे नेटवर्कसोबत हे मुंबईसाठी तिसरे प्रवासाचे माध्यम ठरणार असल्याचे सांगितले जाते.
या उपक्रमांतर्गत सागरी किनारा मार्ग, वांद्रे-कुर्ला संकुल येथील हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा भूमिगत कॉरिडॉर उभारण्याचा संकल्प आहे.
यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि एस. व्ही. रोड वरील वाहतूक कोंडी कमी होणे अपेक्षित आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर अवजड वाहनांची वाहतूक भुयारी रस्त्यावर वळवली जाईल.
सुमारे 70 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जाणार आहे. या माध्यमातून रस्ते आणि मेट्रो यांना पूरक असे एकत्रित वाहतूक नेटवर्क तयार होईल, ज्यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होईल, प्रदूषणात घट होईल आणि कार्यक्षमतेत वाढ होईल.
प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 सप्टेंबर, 2025 रोजी पहिल्या टप्प्यासाठी टेक्नो-इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी आणि डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी निविदा सूचना 10 ऑक्टोबर, 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून 17 ऑक्टोबरला निविदापूर्व बैठक घेण्यात आली. 17 नोव्हेंबरला निविदा उघडण्यात येणार आहेत.