Ulwe Water Protest Pudhari
मुंबई

Ulwe Water Protest: उलवेतील बामणडोंगरीत पाणीटंचाईचा संताप; सिडको कार्यालयावर रहिवाशांचा हंडा मोर्चा

हजारो घरांना पाण्याचा तुटवडा; २० एप्रिलपर्यंत जलवाहिनी काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नवी मुंबईतील उलवे परिसरातील बामणडोंगरी येथील सिडको वसाहतीत राहणाऱ्या रहिवाश्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घराचा ताबा मिळून वर्ष होत आले तरी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त झालेल्या रहिवाश्यांनी शुक्रवारी उलवे येथील सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले.

बामणडोंगरी येथे सिडकोच्या अनंता टॉवर अंतर्गत मोठा गृहप्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पात एकूण 43 इमारती आहेत. सुमारे 5 हजारांहून अधिक घरांसाठी सिडकोने दिवाळी 2022 आणि 2024 मध्ये सोडत काढली होती. 2022 मधील सोडत विजेत्यांना मार्च 2025 पासून घरांचा ताबा देण्यात आला, तर 2024 मधील विजेते सध्या घरांचा ताबा घेत आहेत. परिणामी, या सर्व इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर रहिवासी वास्तव्यास आले आहेत. सुरुवातीच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत होत असला तरी ऑगस्ट 2025 पासून या वसाहतीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

सिडकोने फेस 1 आणि फेस 2 साठी सहा पाणी क्लस्टर तयार केले आहेत. प्रत्येक क्लस्टरमध्ये 6 ते 8 इमारतींचा समावेश असून एकाचवेळी काही इमारतींमध्ये पाणीपुरवठा होतो, तर काही ठिकाणी अजिबात पाणी येत नाही. अनेक वेळा सलग दोन दिवस पाणी न आल्याने रहिवाश्यांना पिण्याचे पाणी बाहेरून विकत घ्यावे लागत आहे. या समस्येबाबत सिडको प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप करत 43 इमारतींतील रहिवाश्यांनी एकत्र येत उलवेतील सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता. मोर्चानंतर सिडको प्रशासनाने शिष्टमंडळाशी चर्चा करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आश्वासन दिले.

त्यानुसार, रोजच्या पाणीपुरवठ्यावर नियमित देखरेख ठेवली जाईल. बिघाडाच्या काळात टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच फेस 1 साठी नव्या जलवाहिनीचे काम 20 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, टर्शिअरी ट्रीटमेंट प्लांटचे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे. या प्रक्रियेनंतर त्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी 15 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रहिवाश्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT