मुंबई : उद्योगांच्या गरजा लक्षात घेत कौशल्य शिक्षणावर भर देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने कौशल्य मार्गदर्शक सूचनांचा मसुदा जाहीर केला आहे. त्यानुसार उच्च शिक्षण संस्थांना प्रमाणपत्र, पदविका, पदवी अभ्यासक्रम सुरू करता येणार असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल विपणन अशा विषयांचा अभ्यासक्रमांत समावेश करून विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य शिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कौशल्य शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठीची कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यावर ३१ जानेवारी अखेरपर्यंत हरकती सूचना नोंदवता येणार आहेत. अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पात्र उच्च शिक्षण संस्थांना अंतर्गत मान्यता प्रक्रिया पूर्ण करून यूजीसीकडे अर्ज करावा लागेल. यूजीसीने नियुक्त केलेली समिती अभ्यासक्रमाला मान्यता देईल. हे अभ्यासक्रम राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम परिषदेच्या आणि राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता आराखड्यातील निकषांनुसार असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम सादर करण्यासाठी यूजीसीकडून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाचे किमान ५० टक्के मूल्यमापन प्रत्यक्ष (ऑफलाइन) पद्धतीने करायचे आहे.