मुंबई : दिव्यांग कल्याण विभागाकडून प्रयत्न सुरू असताना दिव्यांगांनी गेल्या दोन वर्षांत राज्यात केवळ 3 लाख 43 हजार 593 नवीन यूडीआयडी तयार केले आहेत. सध्या राज्यात एकूण 12 लाख 88 हजार 413 दिव्यांगांकडे यूडीआयडी आहे. जुलै 2023 मध्ये ही संख्या 9 लाख 44 हजार 820 होती.
राज्यात 2011 च्या जनगणनेनुसार एकूण 29 लाख 63 हजार 392 दिव्यांग आहेत. त्यापैकी आतापर्यंत 17 लाख 34 हजार 169 दिव्यांगांनी यूडीआयडीसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये 12 लाख 88 हजार 413 दिव्यांगांनी यूडीआयडी मिळवले आहे, तर 2 लाख 58 हजार 194 अर्ज विविध कारणांमुळे नाकारण्यात आले आहेत. सध्या 1 लाख 87 हजार 562 अर्ज प्रक्रियेत आहेत, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागातील एका अधिकार्याने दिली. यूडीआयडी बनवल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ सहज मिळतो. यूडीआयडीमुळे त्यांना स्वतंत्र ओळखपत्र किंवा आधार कार्ड बाळगण्याची गरज राहात नाही. हे कार्ड रेल्वे, एसटी बसच्या तिकीट सवलत व इतर कामांसाठी वापरले जाते.
दिव्यांग व्यक्तींना यूडीआयडी तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या स्वावलंबन कार्ड वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो. आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कार्ड थेट घरी पाठवले जाते. यूडीआयडीवर दिव्यांग व्यक्तीचा फोटो, नाव, यूडीआयडी क्रमांक, अपंगत्वाचा प्रकार व टक्केवारी, जन्मतारीख यांचा समावेश असतो. या कार्डावर बारकोड असतो, जो स्कॅन केल्यावर संबंधित व्यक्तीचे नाव, आधार क्रमांक यासह संपूर्ण माहिती ऑनलाईन मिळते, असेही या अधिकार्याने स्पष्ट केले.